वनहक्क कायद्याची अमलबजावणी, कांदा निर्यात सर्व देशात खुली करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाभरातून पायी आलेल्या हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला आहे. रणरणत्या उन्हामुळे तीन, चार शेतकऱ्यांना त्रास झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील ७३ वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. लाल टोपी, लाल झेंडे घेऊन रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या शेतकऱ्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयास वेढा पडल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माकप आणि किसान सभेने सुरू केलेल्या आंदोलनासाठी आदिवासी भागातून शेतकरी पायी शहरात दाखल झाले. उन्हात पायी चालल्याने काहींना अस्वस्थ वाटूू लागले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यातील भाऊसाहेब गबे (७३, कसबे वणी) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अन्य दोन शेतकऱ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. मागण्यांवर आता सकारात्मक निर्णय व ठोस कृती अपेक्षित आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कितीही दिवस ठिय्या देण्याची आमची तयारी आहे. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हटणार नसल्याचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी स्पष्ट केले. आदिवासी भागातून हजारो शेतकरी १० ते १५ दिवसांचा शिधा घेऊन दाखल झाले आहेत. सायंकाळी गावनिहाय वर्गवारी करून आंदोलकांनी रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, वैयक्तिक वनहक्क धारकांची वनहक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने स्थापलेल्या समितीची तातडीने मंगळवारी दुपारी दीड वाजता मुंबईतील विधानभवन येथे बैठक बोलाविण्यात आली आहे.