नाशिक : शहरात पतंगबाजीसाठी नायलाॅन मांजाचा वापर आणि विक्री प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १२ ते १५ जानेवारी या चार दिवसात ७१ गुन्हे दाखल झाले. सुमारे १०४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मानवी जीवितास व पर्यावरणास धोका निर्माण करणारा नायलॉन मांजाचा वापर करणारे आणि विकणारे अशा दोघांवर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. मकरसंक्रातीच्या दिवशी नायलॉन मांजाचा वापर करत पतंग उडविणाऱ्यांचा पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवत शोध घेण्यात आला. मोहिमेदरम्यान मुंबई नाका येथे एक, अंबड येथे चार, इंदिरानगर येथे सात, उपनगर येथे तीन, नाशिकरोड येथे एक, देवळाली कॅम्प येथे एक असे १६ गुन्हे आणि एक युवक मयत झाल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी झालेल्या कारवाईत १७ गुन्ह्यांमध्ये ३४ व्यक्तींपैकी दोन विधीसंघर्षित बालक आणि त्यांच्या पालकांचा समावेश आहे. दाखल गुन्ह्यात एक लाख तीन हजार रुपयांचा नायलॉन मांजा आणि तीन लाख रुपयांची मोटार असा चार लाख, १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ३४ संशयितांपैकी ३१ जणांना अटक करण्यात आली.
हेही वाचा…इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
नाशिक ग्रामीणमध्येही गुन्हा
मनमाड परिसरात एक जण बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर करुन पतंग उडवित होता. त्यामुळे मनमाड येथील दत्त मंदिर रस्तावरील पुलावरून जाणाऱ्या काकासाहेब भालेराव (४३, रा. वस्ती नगर) यांच्या मानेला, तसेच दोन्ही हाताच्या बोटांना दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.