जळगाव – आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात पाच लाख ५४ हजार ६७५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरीच्या ७२ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. यंदाच्या खरिपात सर्वाधिक पेरण्या जामनेर तालुक्यात ६८ हजार १९ हेक्टर क्षेत्रात झाल्या आहेत. खानदेशचे नगदी पीक असलेल्या कपाशीची चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक लागवड झाली आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र सात लाख ६९ हजार ६०१ हेक्टर आहे. यंदा खरीप हंगामात जून महिना हा कोरडा गेला. कपाशी लागवडीस उशीर झाला. मात्र, जुलैपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात खरीप ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, इतर गळीतधान्य, कपाशी आदी प्रमुख पिके घेतली जातात.
जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात सर्वाधिक ९९ टक्के, त्याखालोखाल पाचोरा तालुक्यात ९२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यंदा मात्र कपाशीची लागवड घटली आहे. कपाशीची चार लाख ४५ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक लागवड झाली आहे. जिल्ह्यात सरासरी कपाशीची लागवड पाच लाख एक हजार ५६८ हेक्टर क्षेत्रात होत असते. गतवर्षाच्या तुलनेत पावसाला विलंब झाल्याने, तसेच अजूनही गत हंगामातील कापूस पडून असल्यामुळे दीड लाख हेक्टर क्षेत्र घटले आहे. कापसाला योग्य दर न मिळाल्याने यंदा लागवड कमी केल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले. जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने मका, ज्वारी, बाजरीचा पेरा वाढला आहे. जिल्ह्यात दरवर्षी ९८ हजार हेक्टर क्षेत्रात मका पिकाची पेरणी होते. यंदा ५१ हजार १५६ हेक्टरवर मका पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ४८३ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ साठी तीन लाख पाच हजार १४० मेट्रिक टन रासायनिक खते मंजूर करण्यात आली आहेत. एक लाख ५७ हजार ९२ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. एक हजार ८०० टन युरीया, २५५ टन डीएपी खतांचा साठा उपलब्ध आहे. खरीप पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. खतांची टंचाई नसून पुरेशा साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
हेही वाचा >>>नाशिक : निधी वाटपात यापुढे दुजाभाव अशक्य – शंभुराज देसाई यांचा दावा
हेही वाचा >>>नाशिक : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे निधन
शासनाने २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेतकरी हिश्श्याचा विमा हप्ता रक्कम शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना केवळ एक रुपया भरून संकेतस्थळावर स्वतः किंवा बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रामार्फत ३१ जुलैपर्यंत अर्ज करावा. तसेच कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० हा हेल्पलाइन क्रमांक असून, शेतकर्यांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा, असे आवाहन कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.