नाशिक : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असताना उत्तर महाराष्ट्रातील ७४९ गाव-वाड्यांना आजही २२४ टँकरमधून पाणी पुरवठा करावा लागत आहे. या भागात टँकर आणि गावांची तहान भागवण्यासाठी एकूण २८३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सुमारे पावणेसहा लाख लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी ऐन पावसाळ्यात टँकर आणि अधिग्रहित विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे.
राज्यातील सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये यंदा आतापर्यंत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरणे असणाऱ्या घाटमाथा परिसरात या हंगामात प्रारंभी दीड महिने पावसाचे प्रमाण कमी होते. तीन, चार दिवसातील संततधारेने तेथील धरणांतील जलसाठा उंचावत आहे. अनेक भागात पुरेशा पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक १८० टँकर नाशिक जिल्ह्यात सुरू आहेत. सात तालुक्यातील १६३ गावे आणि ५५० वाड्यांना सध्या टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. गावांना पाणी पुरवठ्यासाठी ३९ आणि टँकर भरण्यासाठी ९६ अशा एकूण १३५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
हेही वाचा…भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली
जळगाव जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात तशीच स्थिती आहे. ३५ गावांना ४३ टँकरने पाणी पुरवले जात आहे. ११५ विहिरी गावांसाठी तर ३२ विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एका गावास टँकरने पाणी द्यावे लागत आहे. शिंदखेडा तालुक्यात सहा, धुळे तीन आणि साक्री तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात १० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात मात्र एकही टँकर सुरु नाही.
हेही वाचा…एक घोडा, दो दुल्हे निकल गये’ कोडवर्डचा वापर अन्…
शहरी भागासही झळ
उत्तर महाराष्ट्रातील काही शहरांनाही टंचाईची झळ बसत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने मालेगाव शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावले. शनिवारपासून शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मालेगाव महानगरपालिकेने घेतला आहे. वागदर्डी धरण कोरडे असल्याने मनमाड शहरात उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही २२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. धुळे आणि नंदुरबार शहरात सध्या चार दिवसाआड तर जळगाव शहरात नियमित पाणी पुरवठा दोन दिवसाआड होत आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात केवळ २१ टक्के जलसाठा आहे.