रुग्णवाहिकेचा लाभ घेण्यात नाशिक अव्वल
आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘१०८’ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला जिल्ह्यात काही अपवाद वगळता उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दोन वर्षांत या सेवेचा ६० हजारहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेचा लाभ घेण्यात नाशिक हे राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. आतापर्यंत ७५० नवजात शिशूंनी धावत्या रुग्णवाहिकेत जन्म घेतला, तर चार हजारहून अधिक बालकांना विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सेवेचा विशेष लाभ झाला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने ग्रामीण विशेषत आदिवासीबहुल भागात आरोग्यविषयक सेवा सुविधा जलद गतीने पोहचाव्यात, या उद्देशाने ‘१०८’ रुग्णवाहिकेची संकल्पना मांडण्यात आली. या सेवेसाठी जिल्ह्यात ४६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. सकाळ व रात्र या दोन सत्रात ९२ वाहनचालक, ४६ वैद्यकीय अधिकाऱ्यावर रुग्ण सेवेची ही धुरा सांभाळत आहे. या रुग्णवाहिका त्या त्या विभागातील प्राथमिक रुग्णालये, उपरुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांशी संलग्न असून दूरध्वनीवर रुग्ण किंवा नातेवाईकांकडून विचारणा झाली की, अवघ्या १९-२० मिनिटांत ही सेवा त्यांच्या दारात पोहचते, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. दोन वर्षांतील या सेवेचा आढावा घेतल्यास तिची उपयुक्तता अधोरेखीत होत आहे. दोन वर्षांत जिल्ह्यातील ५९ हजार ७१८ हून अधिक रुग्णांनी या रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. त्यात गरोदर माता व महिलांनी जननी सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा योजना अंतर्गत १०८ ला विचारणा केली असता त्यांना ही संदर्भ सेवा देण्यात आली. रुग्णालयात पोहोचण्याआधी काही वेळा खराब रस्ते व भौगोलिक अडचणी यासह काही तांत्रिक अडचणींमुळे ७५० गरोदर मातांची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व नैसर्गिक पद्धतीने बाळंतपणे झाली आहेत. अपवादात्मक स्थितीत बाळंतपण गुंतागुंतीचे आहे हे लक्षात आल्यावर त्यावेळी सिझेरीयनचा अवलंब झाला.
रुग्णवाहिकेत प्रसूती झाल्यानंतर तात्काळ जवळचे रुग्णालय गाठत त्या महिलेला पुढील वैद्यकीय सेवा देण्यात येते. तसेच वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्या ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके (न्युनॅटल ट्रान्सफर) मध्ये राज्यात नाशिक आघाडीवर असून चार हजार २८२ बालकांना यातून आरोग्य सेवा दिली गेल्याची माहिती आपत्कालीन वैद्यकीय सेवा जिल्हा व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी दिली.
अद्याप १०८ चा गैरवापर झाला किंवा कामात हलगर्जीपणा झाल्याची कोणतीही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, १०८ किंवा आरोग्यविषयक कुठलीही तक्रार असल्यास संबंधितांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी किंवा आपत्कालीन वैद्यकीय सेवा जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
‘१०८’चे काम असे चालते
रुग्ण किंवा नातेवाईक वा इतरांकडून १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता तो क्रमांक कुठला ते शोधले जाते. त्याचवेळी ‘जीपीएस’ प्रणालीने त्या मार्गावर कोणते रुग्णालय आहे हे पाहून तेथील ग्रामीण, उपरुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधत रुग्णाविषयी कल्पना दिली जाते. तेथील १०८ वरील वाहनचालकांशी संपर्क साधत अवघ्या १९-२० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचते. दरम्यान, अपघातग्रस्त किंवा आपत्कालीन स्थिती असल्यास नातेवाईक रुग्णाला खासगी रुग्णालयातही घेऊन जाता येऊ शकते. मात्र त्यासाठी काही शुल्क द्यावे लागते.