नाशिक – सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७५० हून अधिक ज्येष्ठ नागरिक मंगळवारी दुपारी अयोध्या येथे दर्शनासाठी विशेष रेल्वेगाडीने रवाना झाले. स्थानक परिसर यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदूमला.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर ही विशेष रेल्वे उभी करण्यात आली होती. स्थानक आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. फलाटावर लाल गालीचा अंथरला गेला. फुलांसह फुग्यांची सजावट करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात यात्रेकरुंचे स्वागत करण्यात आले. आलेल्या यात्रेकरुंची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देत बोगीत बसविण्यात आले. ११ बोगींमध्ये प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे प्रवासात पिण्याचे पाणी, नाश्त्याची सोय करण्यात आली आहे.
समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर यांसह इतरांनी हिरवा झेंडा दाखवत रेल्वेला मार्गस्थ केले. तत्पूर्वी नांदगावकर यांनी अयोध्येला निघालेल्या भाविकांचा प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान केला. १८ ते २२ मार्च असा यात्रेकरुंचा अयोध्या प्रवास असेल. २२ मार्च रोजी पहाटे ही विशेष रेल्वे गाडी नाशिकला परतणार आहे.
वैद्यकीय पथकाची व्यवस्था
यात्रेचे नियोजन समाज कल्याण नाशिक कार्यालयाने केले आहे. प्रत्येक बोगीत समन्वयक नियुक्त केले आहेत. यात्रेकरूंना कुठलीही अडचण येऊ नये, याची खबरदारी म्हणून कर्मचारी व वैद्यकीय पथक औषध-गोळ्यांसह यात्रेकरूंबरोबर आहेत. ज्येष्ठ नागरिकांची खाण्यापिण्यासह अयोध्या येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.