Samruddhhi Highway : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील महामार्गाचं ( Samruddhhi Highway ) काम ९९ टक्के पूर्ण झालं आहे. या महामार्गातील अखेरच्या टप्प्यात असलेला आठ किमी लांबीचा बोगदा हा या चौथ्या टप्प्याचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. यामुळे १२ किमीच्या कसारा घाटाची गरज उरणार नाही. तसंच हे अंतर अवघं आठ मिनिटांत कापलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७६ किमीचा अखेरचा टप्पा ९९ टक्के पूर्ण

नागपूर ते मुंबई हे अंतर आठ तासांत कापता यावं यासाठी समृद्धी महामार्गाची ( Samruddhhi Highway ) निर्मिती करण्यात आली आहे. नागपूर ते मुंबई असा ७०१ किमीचा हा महामार्ग आहे. ७०१ किमी महामार्गापैकी ६२५ किमीचा महामार्ग म्हणजेच नागपूर ते इगतपुरी हा लोकांच्या सेवेत दाखल झाला. आता उर्वरित ७६ किमीचा महामार्ग ( Samruddhhi Highway ) ९९ टक्के पूर्ण झाला आहे. चौथ्या टप्प्यातील या महामार्गावर पाच बोगदे आणि १६ पूल असणार आहेत.

हे पण वाचा- Nagpur Mumbai samruddhi highway : समृद्धी महामार्गातील इगतपुरी – आमणे टप्पा सप्टेंबरअखेर वाहतूक सेवेत दाखल होणार

कसारा घाट लागणारच नाही

इगतपुरी ते आमणे या समृद्धी महामार्गावरील ( Samruddhhi Highway ) चौथ्या टप्प्यातलं सर्वात मोठं आकर्षण काय असेल तर ते म्हणजे आठ किमीचा बोगदा. या बोगद्यामुळे कसारा घाट लागणारच नाही. तसंच कसारा घाटाचं सध्याचं अंतर बारा किमी आहे जे कापण्यासाठी ४० मिनिटं लागतात. मात्र समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या बोगद्यातून गेलेल्या मार्गामुळे हे अंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटात कापलं जाणार आहे. हा बोगदा तयार करणं अत्यंत आव्हानात्मक होतं. आलेली सगळी आव्हानं पेलून आम्ही तो तयार केला अशीही माहिती अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. या प्रकल्पातला ( Samruddhhi Highway ) शेवटचा टप्पा आमच्यासाठी आव्हानात्मक होता असंही त्यांनी सांगितलं.

देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा

समृद्धी महामार्गावरच्या ( Samruddhhi Highway ) चौथ्या टप्प्यातला मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांना जोडतो. सह्याद्रीच्या खडतर पर्वत रांगांमधून मार्ग काढून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केलं आहे. पॅकेज १४ हा इगतपुरी येथील ८ किमीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसंच देशातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. या बोगद्याची रुंदी १७.६१ मीटर इतकी आहे. तर या बोगद्याची उंची ९.१२ मीटर आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आठ ते दहा मिनिटात पार करता येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ नाशिकला जोडणाऱ्या कसारा घाटाला पर्यायी मार्ग झाल्याने वाहतूक जलद होणार आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/samruddhi-7-HD-1080p.mov
समृद्धी महामार्गावरचा हा बोगदा हे या मार्गावरचं सर्वात मोठं आकर्षण असणार आहे. (व्हिडीओ सौजन्य-MSRDC)

डोंगर आणि दऱ्यांचं आव्हान

समृद्धी महामार्गाच्या या अखेरच्या टप्प्यात व्हॅली पूल बांधणं आणि बोगदे बांधणं हे सर्वात जिकिरीचं काम होतं. काही ठिकाणी खडकांत ३० ते ४० मीटरपर्यंत खोदकाम करावं लागलं. या टप्प्यात १६ व्हॅली पूल आहेत पॅकेज १५ मध्ये खोल दरी असल्याने पुलाच्या खांबांची उंची ८४ मीटर आहे म्हणजेच एखाद्या २५ ते २८ मजली इमारती इतकी आहे.

समृद्धी महामार्गाचे कोणते तीन टप्पे वाहतुकीसाठी खुले?

पहिला टप्पा : नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा महामार्ग ११ डिसेंबर २०२२ ला वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

दुसरा टप्पा : शिर्डी ते भरवीर हा ८० किमीचा मार्ग २६ मे २०२३ या दिवशी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

तिसरा टप्पा : ४ मार्च २०२४ या दिवशी भरवीर ते इगतपुरी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

४ ऑगस्ट २०२४ पर्यंत या महामार्गावरुन १ कोटी १८ लाख वाहनांनी सुरक्षित प्रवास केला आहे. या महामार्गाला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 km tunnel on samruddhi highway will cover the distance from igatpuri to kasara in just 8 to 10 minutes it is biggest tunnel in maharashtra scj