लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : मुंबई – आग्रा महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर ओझर येथे गुरुवारी गडाख कॉर्नर येथे मालमोटारीची दुचाकीला धडक बसल्याने आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीची आई आणि बहीण जखमी झाल्या.
गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम प्रकल्पातून घरगुती गॅस सिलेंडरांनी भरलेली मालमोटार ओझरजवळ महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडने मालेगावकडे जात होती. मालमोटार गडाख कॉर्नरजवळील चौकात आली असता एका दुचाकीला धक्का बसला. धक्क्याने दुचाकीवरील अर्पिता शिंदे, तिची आई आणि बहीण खाली पडल्या. परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यावर चालकाने मालमोटार थांबवली. अर्पिता ही मालमोटारीच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिची आई आणि बहीण यांच्या पायाला दुखापत झाली. मालमोटार चालक दारूच्या नशेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी चालक योगेश हांडगे (रा. भेंडाळी, निफाड) याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले.
आणखी वाचा-पेठ तालुक्यात साडेचार लाखाचा गुटखा जप्त
या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहे. अर्पिताचे शवविच्छेदन करण्यासाठी पिंपळगाव येथे मृतदेह नेण्यात आला. ओझर गावात राहणारी अर्पिता ही अभिनव बाल विकास मंदिर शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती.