जळगाव – चोपडा तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, भीजपाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड होत आहे. त्यातच चोपडा येथील विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांची तीन मजली जुनी इमारत पहाटे तीनच्या सुमारास कोसळली.
चोपडा शहरासह तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. तालुक्यातील शेतांमध्ये पाणीच पाणी साचले आहे. चोपडा येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांची तीनमजली जुनी इमारत पहाटे जमीनदोस्त झाली. ही इमारत सुमारे ८० वर्षे जुनी असून, तेथे सद्यःस्थितीत कोणाचेही वास्तव्य नव्हते. प्रा. गुजराथी हे त्यांच्या कुटुंबियांसह नव्या इमारतीत मागील बाजूला राहत असून, कोणालाही कोणतीच हानी पोहोचली नाही. सर्व कुटुंबीय सुखरूप आहेत.
हेही वाचा >>>चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर
प्रा. गुजराथी यांची चोपडा शहरातील गुजराथी गल्लीतील महादेवाच्या मंदिरासमोर तीनमजली जुनी इमारत असून, यातील काही भाग पावसाने जमीनदोस्त झाला. सकाळपासून कोसळलेली इमारत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रा पावसाने लहान-मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली असून, जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्प मिळून २९.१७ टक्के जलसाठा झाला आहे. जळगाव जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प, १४ मध्यम प्रकल्प व ९६ लघु प्रकल्पांतही जलसाठा झाला आहे. काही दिवसांपूर्वी लघु प्रकल्प कोरडेठाक होते. मध्य प्रदेश व विदर्भातील पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
© The Indian Express (P) Ltd