लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: सटाणा शहरातील मराठा हायस्कूलगत वास्तव्यास असलेले ठेकेदार निखिल अहिरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९० हजाराच्या रोकडसह नऊ लाखांचा सोन्याचा ऐवज व घरासमोर उभी असलेली ३० लाख रुपयांची इनोव्हा मोटार चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा-महावितरणच्या कारभारावर उद्योजकांचा रोष, संवाद कार्यक्रमात तक्रारींचा भडिमार
सटाणा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अहिरे हे कुटुंबियांसोबत नाशिकला गेले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पहाटे त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी ९० हजार रुपयांची रोकड, १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास करत घरासमोर उभी असलेली ३० लाख रुपयांची इनोव्हा कार चोरून नेली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने ताहाराबाद रस्त्यापर्यंत माग दाखविला. पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही तपासले असता पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी घरफोडी करून घरासमोर उभ्या असलेल्या इनोव्हा कारमधून ताहाराबादकडे पलायन केल्याचे चित्रणात दिसत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, प्रभारी पोलीस अधिकारी रजनीकांत चिलूमुला, किरण पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.