जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ४१ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून त्यातील ३२ हजार १३६ रुग्ण बरे झाले, तर या आजाराने आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक ५०९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.४४ टक्के आहे.
जिल्ह्य़ात शुक्रवारी सकाळपर्यंत करोनाबाधितांची संख्या ४० हजार ४५३ वर पोहोचली. सद्य:स्थितीत साडेसात हजार रुग्ण उपचार घेत आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास ज्या भागात आधी रुग्ण कमी होते, तिथेही त्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात सध्या सुमारे अडीच हजार रुग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक तालुका ४१४, चांदवड ५२, सिन्नर ४४५, दिंडोरी ७२, निफाड ४५८, देवळा ७८, नांदगांव २७१, येवला ६९, त्र्यंबकेश्वर ३६, सुरगाणा आणि पेठ प्रत्येकी सहा, कळवण १०, बागलाण १९५, इगतपुरी ७४, मालेगांव ग्रामीण ३०१ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चार हजार ३४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५६९ तर जिल्ह्याबाहेरील १८ रुग्ण उपचार घेत आहेत.
करोनामुळे नाशिक ग्रामीणमधील २५४, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५०९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११३ आणि जिल्हा बाहेरील २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ७२.३३ टक्के, नाशिक शहरात ८२.४४, मालेगाव शहरात ७४.६० तर जिल्हा बाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.१३ टक्के आहे.