आपल्या वैशिष्टय़पूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय आंब्याची समस्त अमेरिकावासीयांना पडलेली भुरळ कायम असून मुबलक उत्पादनामुळे यंदा निर्यातीचा नवीन टप्पा गाठला जाण्याची चिन्हे आहेत. प्रारंभीच्या दोन-तीन आठवडय़ातच लासलगावच्या कृषक केंद्रात विकिरण प्रक्रिया केलेला ९९ टन आंबा अमेरिकेला रवाना झाला आहे. या केंद्रात कोकणातील आंबा अद्याप आला नसला तरी देशभरातील आंबे प्रक्रिया करण्यासाठी येत आहेत. या हंगामात ५०० टन आंब्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेत हापूससोबत केशर, राजापुरी, बदाम यांची निर्यात होत आहे.
अनेक देशांतील नागरिकांना आपल्या चवीने वेड लावणाऱ्या आंब्याची गोडी अमेरिकावासीयांना गेल्या काही वर्षांपासून चाखण्यास मिळत आहे. या वर्षी सर्वाधिक निर्यात होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकन बाजारपेठेत कोणत्याही कृषी मालास प्रवेश करावयाचा असेल तर त्याला प्रथम २१ निकषांचे अडथळे पार करावे लागतात. त्यात तो माल किटाणूविरहित असणे महत्त्वाचे आहे.
याकरिता आंब्यावर विकिरण प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याने भाभा अणू संशोधन केंद्राने नाशिक जिल्ह्य़ातील लासलगाव येथे खास कृषक केंद्राची उभारणी केली. आंब्याची जागतिक बाजारपेठ विस्तारण्याच्या उद्देशाने काही काळ या केंद्राची धुरा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने सांभाळली. दरम्यानच्या काळात पणन मंडळाने नवी मुंबई येथे स्वत:च्या विकिरण केंद्राची उभारणी केली. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेल्या कृषक केंद्राची जबाबदारी खासगी संस्थेकडे सोपविणे क्रमप्राप्त ठरले. गेल्या वर्षी ही प्रक्रिया विलंबाने पार पडल्याने या केंद्रात ३३४ टन आंब्यावर प्रक्रिया करणे शक्य झाले. यंदा मात्र, संपूर्ण हंगामात अधिकाधिक आंब्यावर प्रक्रिया करून निर्यात वृद्धिंगत करण्याकडे लक्ष दिले जात आहे. अमेरिकेत निर्यात करावयाच्या आंब्यावर ही प्रक्रिया करावी लागत असल्याने कोकणच्या हापूसचा अमेरिका प्रवास हा आजतागायत नाशिकमार्गे करणे क्रमप्राप्त होते. आता मात्र नवी मुंबईत या स्वरूपाचे केंद्र अस्तित्वात आल्याने तो आंबा नाशिकला कितपत येईल, याबद्दल साशंकता आहे. परंतु देशातील वेगवेगळ्या भागांतून अमेरिकेला निर्यात होणारा आंबा या प्रक्रियेसाठी दाखल होत आहे. यंदा २० एप्रिलपासून विकिरण प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभीच्या १५ दिवसांतच ९९ टन आंब्यावर ही प्रक्रिया करून तो अमेरिकेला पाठविण्यात आल्याची माहिती केंद्राचे अधिकारी जतिन म्हात्रे यांनी दिली. त्यात हापूस, केशर, बदाम, राजापुरी व बेंगलपल्ली आंब्याचा समावेश आहे. यंदा मुबलक उत्पादन असल्याने अमेरिकेला तो आधिक्याने निर्यात करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेला जो आंबा निर्यात केला जातो, त्यावर प्रथम विकिरण प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया करणारे गतवर्षांपर्यंत देशातील हे एकमेव केंद्र होते. गॅमा किरणांचा मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीडही नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो.
उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते. निर्यातदारांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन या केंद्राने जादा कामाद्वारे निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न ठेवला आहे. भारतीय आंब्यास अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, सॅन-फ्रान्सिस्को, लॉस एन्जलिस शिकागो, मियामी, नेवार्ड, दलास आदी शहरांतून मागणी असल्याचे निर्यातीच्या आकडेवारीवरून लक्षात येते.
निर्यातीचा चढता आलेख
अमेरिकेत हापूससह इतर काही निवडक भारतीय आंब्यांची निर्यात २००७ मध्ये सुरू झाली. दरवर्षी हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. प्रारंभीच्या सहा वर्षांत एकूण १,०७९ टन आंबा निर्यात करण्यात आला होता. पहिल्या वर्षी म्हणजे २००७ मध्ये १५७ टन आंबा अमेरिकेला निर्यात झाला. देशांतर्गत उत्पादनानुसार हे प्रमाण वाढते राहिले. यंदा म्हणजे २०१६ मध्ये प्रारंभीच्या पंधरा दिवसांत नाशिकहून ९९ टन आंबा विकिरण प्रक्रिया झाल्यावर अमेरिकेला पाठविण्यात आला आहे.