जळगाव: शेतातून चारा घेऊन येत असताना शेतबांधावरून बैलगाडी उलटल्याने लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने सातवीतील १३ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी जळगाव तालुक्यातील वाकडी गावाजवळ हा अपघात झाला.गौरव आनंदा पाटील ( रा. वाकडी, ता. जळगाव) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव हा आई-वडील, भाऊ व बहीण यांच्याबरोबर जळगाव तालुक्यातील वाकडी येथे वास्तव्याला होता. तो म्हसावद येथील थेपडे शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता. आई-वडिलांसह भाऊ-बहिणी शेतीकाम करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी दुपारी चारा आणण्यासाठी बैलगाडीने गौरव शेतात गेला. शेतबांधावरून बैलगाडीने चारा घेऊन येत असताना बैलगाडी अचानक उलटली. यात बैलगाडीच्या लोखंडी कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्यामुळे लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावले लाविळा गौरवच्या कपाळात घुसला. त्यातच गौरवचा मृत्यू झाला. शेतात काम करणार्या काही शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेत गौरवला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी धाव घेत माहिती घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गौरवमागे वडील, आई, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.