लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: शहरासह परिसरात डेंग्यू पसरण्यास प्रारंभ झाला आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील १९ वर्षीय तरुणाचा डेंग्यूने उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. देवेंद्र बारी असे मृत तरुणाचे नाव आहे. आणखी तीन बालके डेंग्यूबाधित असल्याचे अहवालातून निदान झाले आहे. ते खासगी रुग्णालयात दाखल आहेत. यात मंदार सोनवणे (१४), चंद्रकांत पाटील (१६) आणि वेदिका पाटील (१४) यांचा समावेश आहे. आजारपण जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
देवेंद्र हा कुटुंबियांसह शिरसोली येथील बारीनगर भागातील जलकुंभाजवळ वास्तव्याला होता. काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्याअनुषंगाने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तो वास्तव्याला असलेल्या बारीनगर भागातील जलकुंभाजवळ घाणीचे साम्राज्य आहे. आजूबाजूच्या भागातील घरांचे सांडपाणी त्याच्या घराजवळच साचते. त्यामुळे त्याला डेंग्यू विषाणूची लागण झाल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… धुळे महापालिकेतून जन्म-मृत्युचे दाखले आता मोफत; महासभेत निर्णय
या गावात आरोग्य केंद्रासह फिरते आयुर्वेद चिकित्सालयही आहे. गावात सध्या अस्वच्छताही पसरली आहे. त्यामुळे साथरोग पसरण्याची भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात आहे. तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा झोपेतून जागी झाली असून, गावात म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश अग्रवाल यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह मलेरियाचे कर्मचारीही गावात पाहणी करीत आहेत. त्यांच्याकडून डासांची व्युत्पत्ती स्थानांवर फवारणी केली जात आहे. शिवाय, गावातील घऱोघरी पथकाकडून भेटी दिल्या जात असून, स्वच्छता राखण्याबाबतही जनजागृती केली जात आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोज डेंग्यूसदृश आजाराचे २० ते २५ रुग्ण दाखल होत आहेत.
हेही वाचा… शनिवारी नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, म्हसावद येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश अग्रवाल यांनी गावात भेट दिली आहे. आशा स्वयंसेविकांसह अंगणवाडी सेविकांकडून गावात सर्वेक्षण सुरू केले जात असून, आणखी तीन बालके डेंग्यूबाधित असल्याचा अहवालातून निदान झाले आहे. त्यात मंदार सोनवणे (१४), चंद्रकांत पाटील (१६) आणि वेदिका पाटील (१४) यांचा समावेश आहे.
डेंग्यू आजाराची लक्षणे
सामान्य लक्षणे साधारणपणे दोन ते सात दिवस टिकतात. थंडी वाजून उच्च दर्जाचा ताप, तीव्र सांधे आणि स्नायुवेदना, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, सुरुवातीच्या तापानंतर दोन ते पाच दिवसांदरम्यान त्वचेवर पुरळ दिसणे, सुजलेल्या लसिका ग्रंथी, थकवा, अस्वस्थता किंवा चिडचिड आदी लक्षणे दिसून येतात. गंभीर लक्षणांमध्ये श्वास लागणे, कमी हृदय गती, वारंवार उलट्या, थंड चिकट अंग, कावीळ, लघवी कमी होणे, तीव्र डोकेदुखी आणि पोटदुखी, उत्स्फूर्त किंवा अनियंत्रित रक्तस्त्राव भाग, जोरदार घाम येणे आदी.
शिरसोली येथील तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्याने ताप आल्यानंतर घरगुती उपचार केले. मात्र, गंभीर झाल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावात आरोग्य विभागासह मलेरियाच्या कर्मचार्यांकडून घरोघरी भेटी घेत माहिती घेतली जात आहे. नागरिकांनीही ताप, सर्दी, खोकला यांसह आजार जाणवल्यास निष्काळजी न करता तातडीने डॉक्टरांकडे तपासणी करून सल्ला घ्यावा. – डॉ. सचिन बहेकर (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव)