नाशिक जिल्ह्यातील सातपूर येथील महादेव वाडीलगतच्या नाल्यात शनिवारी रात्री अजगर आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावण निर्माण होतं. वन विभागाने सर्पमित्रांच्या मदतीने अजगराला पकडून नंतर नैसर्गिक सानिध्यात सोडले. सुमारे आठ फूट लांब असलेल्या या अजगराचे २० किलो वजन आहे.
सातपूर हा कामगार वसाहतीचा परिसर आहे. महिंद्रा चौकालगत महादेव वाडी परिसरातून नासर्डी नाला जातो. या नाल्यात रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोठ्या आकाराचा साप स्थानिक नागरिकांना दृष्टीपथास पडला. त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक सर्पमित्र व्ही. एम. स्वामी यांच्यासह वन विभागाला दिली. स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तो साप म्हणजे अजगर असल्याचे लक्षात आले. त्यांनी अजगराला पकडून तो वन विभागाच्या स्वाधीन केला.
वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच इको संस्थेचे सदस्य वैभव भोगले, एकनाथ मंडळ, सागर यांच्या मदतीने अजगराला अन्यत्र निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितपणे सोडण्यात आले. यावेळी एम. एस. गोसावी, नाशिकचे वनपाल अनिल अहिरराव आणि जगदीश आयतुक उपस्थित होते. शहरात अजगर आढळण्याची ही पहिली घटना नाही. नदी, नाले जिथे दाट झाडी आहे अशा ठिकाणी अजगर वास्तव्य करतात. जुने वाडे वा तत्सम ठिकाणी अजगर आढळल्याची उदाहरणे असल्याचे वनपाल अहिरराव यांनी सांगितले.