लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: शहरातून गेलेल्या महामार्गावरील मृत्यूचा सापळा म्हणून ओळख बनू पाहत असलेल्या आकाशवाणी चौकात मंगळवारी दुपारी भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले. मृत दुचाकीस्वाराची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

बांभोरी ते अजिंठा चौफुलीदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस कायम वर्दळ असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जळगाव शहर वसले आहे. महामार्गावर खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंप, मानराज पार्क, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, प्रभात चौक अर्थात मू. जे. महाविद्यालय चौक पुढे आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली, कालिंकामाता चौक असून, आकाशवाणी चौकात महामार्गाच्या मध्यभागी चुकीच्या पद्धतीने बेट केले आहे. त्यामुळे अनेक अपघात घडतच असतात. यात अनेकांचा जीवही गेला आहे.

हेही वाचा… धुळ्यात ठाकरे गटाचे कांदाफेक आंदोलन; निर्यात शुल्कवाढ रद्द न झाल्यास सत्ताधाऱ्यांना गावबंदीचा इशारा

मंगळवारी दुपारी पुन्हा अपघात होऊन भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले. प्राथमिक माहितीनुसार, जळगावहून धुळ्याकडे जाणार्‍या टँकरने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा टँकरच्या मागील चाकात आल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मृत दुचाकीस्वाराची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा… धुळ्यातून चार दुचाकींची चोरी

दरम्यान, आकाशवाणी चौक ते बांभोरी हा विद्यार्थ्यांच्या वर्दळीचा रस्ता आहे. महाविद्यालये, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरीतील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांसह इतर शैक्षणिक संस्था महामार्गालगतच आहेत. प्रभात कॉलनी चौक ते गुजराल पेट्रोलपंप या मार्गावर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ये-जा करताना दिसतात.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bike rider died in an accident between tanker and two wheeler at akashwani chowk jalgaon dvr