नाशिक – कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या संशयाने अडचणीत आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आता बनावट कागदपत्रे सादर करून महानगरपालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी केल्यावर सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली असताना आता महानगरपालिकेतील ठेकेदारी व्यवसाय आणि त्याचवेळी भूषविलेली नगरसेवक, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता या पदांनी बडगुजर यांचा पाय अधिकच खोलात गेल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांच्या पत्राच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनपाचे माजी नगरसेवक बडगुजर यांची चौकशी केली होती. त्यामध्ये बडगुजर यांनी बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीतून डिसेंबर २००६ मध्ये निवृत्ती घेतल्याची बनावट कागदपत्रे मिळवून त्यांनी महानगरपालिकेत २००७ पासून नगरसेवक व अन्य पदे भूषवल्याचे समोर आले. महत्वाची बाब म्हणजे बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीला महापालिकेतून विविध ठेके मिळवून देत या कंपनीतून २००६ ते २००९ या कालावधीत सुमारे ३४ लाख रुपये स्वीकारून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतला.

दोन साथीदारांसमवेत संगनमताने त्यांनी महापालिकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुधाकर बडगुजर, साहेबराव शिंदे, सुरेश चव्हाण या तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे ठाकरे गटाच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case against sudhakar badgujar in the case of defrauding the municipal corporation amy
Show comments