लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार: नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता करुन १० कोटी ८२ लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी महसूल तहसीलदारांनी त्यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या वतीने महसूल तहसीलदार अनिल गवांदे यांनी तक्रार दिली. मंजुळेच्या कार्यकाळातील अनियमिततेची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
नंदुरबार जिल्हाधिकारी पदावर २२ फेब्रुवारी २०१९ ते १८ जुलै २०१९ या कालावधीत मंजुळे कार्यरत होते. शासनाने दिलेली महसुली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनधिकृत बिनशेती, भोगवटदार अशा एकूण १६ प्रकरणात सहायक जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडून मूल्यांकन अहवाल न घेता नजराना अभिमूल्य रक्कम निश्चित करुन किंवा इतर अनियमितता करुन शासनाचे एकूण १०,८२,६४,२२० रुपये एवढे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका मंजुळे यांच्यावर आहे. याशिवाय इतर चार प्रकरणात शासकीय नियम अटी-शर्तींचे उल्लंघन केले आहे.
हेही वाचा… अपहार प्रकरणी धुळे जिल्ह्यात सरपंच, ग्रामविकास अधिकारी निलंबित
आदेश देताना बनावट जावक क्रमांकाची नोंद त्यांच्यावर आहे. जिल्हाधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केला आहे. नमूद प्रकरणात आदेश देण्याचे किंवा मंजुरी देण्याचे सर्वतोपरी अधिकारी शासनाचे आहेत. याची त्यांना सुरुवातीपासून जाणीव असतांनाही स्वत: च्या स्वाक्षरीने सदरचे आदेश दिले आहेत. संबंधीत प्रकरणांची नोंदवहीत त्याच क्रमांकाने इतर प्रकरणे नोंदविली गेली असतांनाही बनावट दस्तांवर तेच क्रमांक नोंदविण्यात आले आहेत. सदरची प्रकरणे संबंधित विभागाच्या कार्यालयात दाखल न करताच बनावट दस्तऐवजाद्वारे शासनाची फसवणूक आणि ठकवणूक मंजुळे यांनी केली आहे.
हेही वाचा… नोंदणी मुद्रांक विभागाद्वारे आता दर्जेदार सेवा; पालकमंत्री दादा भुसे यांना विश्वास
अवघे पाच महिने नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून राहिलेले बालाजी मंजुळे यांची कार्यशैली कायमच वादग्रस्त राहिली होती. यानंतर ते तेलंगणा येथे त्यांच्या मूळ नियुक्तीकडे पुन्हा वर्ग झाले. आता या सर्व प्रकरणांबाबत त्यांच्यावर काय कारवाई होते. याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.