नाशिकमध्ये शेती गट क्रमांकाची मोजणी करून त्यात पोट हिस्स्याच्या खुणा दाखविण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपिक नीलेश कापसेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. महिनाभरातील दुसऱ्या कारवाईने भूमी अभिलेखमधील लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली. या कार्यालयात लक्ष्मी दर्शनाशिवाय कुठलेही काम होत नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- सावरकर थीम पार्कसह संग्रहालयासाठी पाच कोटींचा निधी, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

तकारदाराच्या वडिलांच्या मालकीची पळसे गावात शेती आहे. या शेती गट क्रमांकाची मोजणी करून पोट हिस्स्साच्या खूणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी वैयक्तिक मेहनताना म्हणून प्रत्येक गटाचे १० हजार यानुसार चार गटांचे ४० हजार रुपये आणि या नकाशावर शासकीय शिक्के तसेच स्वाक्षरी आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे ५० हजार यानुसार दोन लाख रुपयांची मागणी संशयित लिपिक नीलेश कापसेने केली होती. परंतु, तक्रारदाराने केवळ हद्दीच्या खुणा दाखवून देण्यास सांगितल्याने संशयित कापसेने प्रत्येक गटाचे १० हजार यानुसार चार गटांच्या हद्दी खुणा दाखविण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भातील तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. सोमवारी तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पथकाने कापसेला ((३७, रा. नवोदय सहकारी सोसायटी उदयनगर, मखमलाबाद) पकडले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा- खोक्यांचा मोह नेत्यांना, शिवसैनिकांना नव्हे, शिवगर्जना मेळाव्यात अनंत गीते यांचे प्रतिपादन

या कारवाईची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सापळा अधिकारी म्हणून संदीप घुगे यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन व शिपाई नितीन नेटारे यांचा समावेश होता. उपरोक्त प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयातील अन्य कुणाचा सहभाग आहे का, या अनुषंगाने तपास केला जाणार असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

हेही वाचा- जगभरात कांद्याची टंचाई, महाराष्ट्रात रस्त्यावर फेकण्याची वेळ! राज्यात दीड महिन्यात प्रति क्विंटल ८०० रुपयांची घसरण

यापूर्वी प्रभारी उपसंचालक, लिपिकावरही कारवाई

फेब्रवारीच्या प्रारंभी भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधिक्षक तथा उपसंचालक (अतिरिक्त कार्यभार) महेशकुमार शिंदे आणि कनिष्ठ लिपिक अमोल महाजन यांना ५० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीचा भूमी अभिलेख कार्यालयाने तयार केलेल्या हिसा नमुना १२ मध्ये लिखाणात झालेली चूक दुरुस्तीचा आदेश देण्यासाठी शिंदेने एक लाखाच्या लाचेची मागणी करीत त्यातील ५० हजार रुपये स्वीकारले होते. तर दुसरा संशयित महाजनने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांची कुठलीही कामे सहजपणे होत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A copy clerk in the land records office was caught red handed by a team of the anti corruption department while accepting a bribe dpj