नाशिक : कायदा व सुव्यवस्थेचा डंका पोलिसांकडून पिटला जात असताना गुन्हेगारांकडून आव्हान देणे सुरुच आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास तीन संशयितांनी अंबड परिसरातील श्री ज्वेलर्स दुकानात सशस्त्र लूट केली. दुकानातील २० ते २५ तोळे सोने घेऊन चोरांनी पोबारा केला. भरदिवसा लूट झाल्याने परिसरात व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.

शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न होत असले तरी गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे. गृह विभागाच्या वतीने १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमातंर्गत अलीकडेच सराफ व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत सराफ व्यावसायिकांनी पोलिसांना आणि पोलिसांनी व्यावसायिकांना काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी होत असतानाच सोमवारी अंबड परिसरातील लक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स दुकानात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास लूट झाली. सोमवारी दुपारी दुकानात मालक दीपक घोडके आणि मनिषा घोडके असताना दोन जण तोंडाला रुमाल लावत दुकानात शिरले. घोडके दाम्पत्याचा ग्राहक आल्याचा समज झाल्याने त्यांनी त्यांना कोणते दागिने दाखवू, अशी विचारणा केली. यावेळी एकाने दीपक यांच्यासमोर बंदुक रोखली. बंदुकीचा धाक दाखवत चोरांनी सोन्याचे दागिने पिशवीत टाकण्यास सुरूवात केली. यावेळी बाहेर देखरेखीसाठी असलेली तिसरी व्यक्तीही आतमध्ये आली. अवघ्या पाच मिनिटात लूट करुन चोरट्यांनी पोबारा केला. त्याआधी घोडके दाम्पत्यावर गुंगीच्या औषधाचा फवारा मारण्याचा प्रयत्न केला.

चोरटे दुकानापासून काही अंतरावर उभ्या केलेल्या दुचाकीवर बसून पळाले. हा प्रकार समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार, स्थानिक गुन्हे शाखा दोनचे उपायुक्त प्रशांत बच्छाव घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी तपासास सुरूवात केली. याप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकारामुळे दुकानासमोरील रस्त्यावर बघ्यांनी गर्दी केली होती. भरदिवसा दुकानात लूट करण्यात आल्याने व्यावसायिकांसह नागरिकही भयभीत झाले आहेत.

दुकानातील सीसीटीव्ही बंद

सोमवारी दुपारच्या सुमारास दोन चोरट्यांनी श्री ज्वेलर्स या दुकानात लूट केली. दरोडा टाकत असतांना तिसरा जण यात सहभागी झाला. चोरट्यांनी पाहणी करत हा दरोडा टाकला. यामध्ये २० ते २५ वर्षाच्या युवकांचा समावेश असून दोन जण दुकानात असताना एकाने दुचाकी दुसरीकडे उभी केली होती. दुकानातील सीसीटीव्ही बंद असून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अंबड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा तपास करत आहे. – प्रशांत बच्छाव (पोलीस उपायुक्त, स्थानिक गुन्हे शाखा-दोन)

Story img Loader