नाशिक शहरातील त्र्यंबक रस्त्यावरील सायकल मार्गिकेच्या कामावेळी खोदकामात झाडांची मूळे तोडणाऱ्या ठेकेदारास अखेर महापालिकेने ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या निर्देशानंतरच महापालिकेला कारवाई करण्याची उपरती झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- रखडलेल्या कामामुळे वनोली-सटाणा रस्ता खड्डेमय, धुळीचे साम्राज्य; ठाकरे गटाकडून आंदोलन

त्र्यंबक रस्त्यावर वेद मंदिर ते ग्रीन व्ह्यू हॉटेल दरम्यान सायकल मार्गिकेचे काम सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी खोदकामात परिसरातील झाडांची मुळे तोडली गेली होती. त्यामुळे भविष्यात ही झाडे पडून पर्यावरणीय तसेच वित्त आणि जिवित हानी होऊ शकते, याकडे एका तक्रारीद्वारे पर्यावरणप्रेमी स्वप्निल गायकवाड यांनी लक्ष वेधले होते. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या तक्रारीवर उद्यान विभागाने शहर अभियंत्यांना अजब सूचना केली. सायकल मार्गिका विकसित करताना झाडांच्या मूळांना इजा होणार नाही याबाबत संबंधित ठेकेदाराला समज देण्यात यावी, असे या विभागाने शहर अभियंत्यांना कळवले होते. तक्रारीवर झालेल्या कारवाईचा तपशील गायकवाड यांनी माहितीच्या अधिकारात मागितला असता शहर अभियंता आणि उद्यान विभागातील पत्रव्यवहार उघड झाला. या प्रकरणात ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम होत असल्याचे लक्षात घेऊन गायकवाड यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे दाद मागितली.

हेही वाचा- नाशिक : उपोषणकर्ते मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

ठेकेदारावर ठोस कारवाई न करता ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम महानगरपालिका करीत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची महापालिकेला सखोल चौकशी करण्याचे निर्देश देऊन त्याचा कार्य अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश द्यावेत. दंडाची आकारणी केल्याशिवाय या ठेकेदाराचे अंतिम देयकही दिले जाऊ नये, अशी मागणी गायकवाड यांनी केली होती.

या तक्रारीची दखल घेत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मनपा आयुक्त व नगरविकास विभागाचे उपसचिव यांना निर्देश दिले. ठेकेदाराने झाडांची मूळे तोडल्याच्या तक्रारीबाबत महानगरपालिकेकडून केवळ समज दिल्याबद्दल विचारणा केली. या प्रकरणात संबंधित बाबींवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले गेले. आपल्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणात मनपाने ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केल्याचा दावा गायकवाड यांनी केला. मनपाने एन. के. वर्मा या ठेकेदाराकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईची कागदपत्रे गायकवाड यांनी माहितीच्या अधिकारात मिळवली आहे.

हेही वाचा- नाशिक जिल्ह्यात दोन दिवस नदी सर्वेक्षणासह पर्यावरणविषयक उपक्रम; जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांची उपस्थिती

उद्यान विभागाची अजब तऱ्हा

झाडांची मूळे तोडल्याच्या प्रकरणात मनपाच्या उद्यान विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागास पाठविलेल्या पत्रावरून या विभागाची अजब कार्यशैली उघड झाली. सायकल मार्गिकेचे काम करताना झाडांच्या मूळांना इजा होणार नाही याबाबत संबंधित ठेकेदाराला समज द्यावी, असे उद्यान विभागाने सुचविले होते. खोदकामात कमकुवत झालेली मूळे झाड पडण्यास कारक ठरू शकतात. त्यामुळे भविष्यात अनर्थ घडू शकतो. हिरवेगार झाडे मरणासन्न स्थितीत जाऊ शकतात. झाडे आणि मूळांच्या सुरक्षेचा कुठलाही विचार न करता मनपा प्रशासनाने केवळ ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम केल्याची तक्रारदाराची भावना आहे.

हेही वाचा- धुळे मनपा सेवेत हद्दवाढीतील ७० कर्मचारी समाविष्ट

तक्रारदाराचे आरोप तथ्यहीन

उपरोक्त प्रकरणात ठेकेदाराला महानगरपालिकेने पाठिशी घालण्याच्या प्रयत्न केल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. सायकल मार्गिकेच्या खोदकामात झाडांची मूळे तुटल्याचे निदर्शनास आल्यावर प्रारंभी ठेकेदाराला समज दिली गेली होती. त्यानंतरही ठेकेदाराने झाडांच्या मुळांना इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतली नाही. पुन्हा तसाच प्रकार घडल्याचे लक्षात आल्यावर महापालिकेने संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आणि दंडात्मक कारवाई केल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे पत्र आणि दंडात्मक कारवाईचा संबंध नाही. झाडांना कुणीही हानी पोहोचल्यास कारवाई केली जाते, याकडे या विभागाने लक्ष वेधले. मनपाच्या बांधकाम विभागाने देखील ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे कुठलेही कारण नसल्याचे नमूद केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fine of rs 40 thousand rs was imposed on the contractor who cut the roots of trees while digging the cycle track on trimbak road in nashik city dpj