नाशिक – अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिडको येथे पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा टाकून एक लाख सहा हजाराचा भेसळयुक्त साठा जप्त केला. सिडकोतील अंबड लिंक रोडवर हा छापा टाकण्यात आला.
अंबड लिंक रोडवरील अशोक यादव, मे. तिस्ता क्रोप केअर प्रा. लि., या उत्पादकांच्या कारखान्याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून करण्यात आली. रिफाइंड पोमोलिन तेलाचा वापर करुन पनीर तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पनीर, रिफाइंड पोमोलिन तेल, मिक्स मिल्क या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. पनीरचा ४६, ५६० रुपयांचा १९४ किलो, रिफाइंड पोमोलिन तेलाचा १४,९६० रुपयांचा ८८ किलो आणि मिक्स मिल्कचा ४४,९४० रुपयांचा १४९८ लिटर, असा एकूण रु. १,०६,४६० किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
हेही वाचा – नाशिक : बिऱ्हाड मोर्चा स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांशी मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा
हेही वाचा – नाशिक : बिऱ्हाड मोर्चामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, ठिकठिकाणी कोंडी
भेसळयुक्त पनीर, मिक्स मिल्कचा साठा नष्ट करण्यात आला. तर रिफाइंड पोमोलिन तेलाचा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या कारवाईतील चारही अन्न नमुने विश्लेषणासाठी विश्लेषकांकडे पाठविण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अहवालाच्या आधारे अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.