नाशिक – शहर परिसरात गुन्हेगारीचे वाढलेले लोण आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. शनिवारी इयत्ता १० वीचा पेपर सुटल्यानंतर एका विद्यार्थ्यावर १५ ते २० जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याचे म्हटले जाते. पोलिसांनी हा हल्ल्याचा प्रकार नाकारला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. म्हसरूळ पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काकासाहेब देवधर इंग्लिश मीडियम स्कुलमधील ओम शिंदे याचा इयत्ता १० वी परीक्षेच्या पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. त्यावेळी संशयित विद्यार्थ्यांनी त्याला बाहेरून मुले बोलावू का, अशी धमकी दिली होती. शनिवारी पेपर सोडवून ओम परीक्षा केंद्रावरून बाहेर पडल्यावर त्याच्या पाठीमागे १५ ते २० जणांचे टोळके लागले. त्यातील काहींच्या हातात कोयते होते. हा प्रकार पाहून ओम घाबरून पळाला. त्यावेळी एकाने केलेल्या हल्ल्यात ओमच्या कानाला लागले. जखमी ओम यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा – दंगली घडवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा आरोप
हेही वाचा – अमळनेर तालुक्यातील पेट्रोलपंपावर लुटीचा थरार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिसांनी कोयत्याने हल्ला झाल्याचे फेटाळून लावले आहे. विद्यार्थ्यांमध्ये झालेला हा वाद असून यात बाहेरचा कोणाचा संबंध नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे प्रभारी पोलीस अधिकारी अहिरे यांनी सांगितले.