नाशिक शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कालिका देवीच्या यात्रोत्सवावर पावसाचे सावट आहे. हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने मंदिर परिसरात भव्य जलरोधक मंडप उभारण्यात येणार आहे. करोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात हा यात्रोत्सव होत आहे. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक व २०० स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहे. ज्या भाविकांना तत्काळ दर्शन घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी मंदिर संस्थान १०० रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा- नाशिक : जायकवाडी तुडूंब भरेल इतके पाणी प्रवाहीत ; हंगामात १०४ टीएमसीचा विक्रमी विसर्ग
महिला व पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था
कालिका देवीचा यात्रोत्सव २६ सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. यात्रोत्सवाच्या नियोजनासंदर्भात सोमवारी मंदिर संस्थान व पोलीस यांची एकत्रित बैठक पार पडली. दोन वर्षानंतर यात्रोत्सव होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. यात्रोत्सवात भाविकांना सुखकर दर्शन घेता यावे यासाठी विशेष नियोजन केले जाणार आहे. त्या अंतर्गत पावसाची शक्यता गृहीत धरून भव्य जलरोधक मंडप उभारला जाईल. दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली जाणार आहे. या काळात मंदिराच्या प्रांगणात २४ तास प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित राहील.
हेही वाचा- कांद्यावरून उत्पादक-नाफेड संघर्ष ; आणखी दरघसरणीच्या भीतीमुळे स्थानिक बाजारात विक्रीला विरोध
मंदीर २४ तास खुले
भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी २४ तास सुमारे २०० हुन अधिक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वीज पुरवठ्यात अकस्मात अडचणी उद्भवल्यास जनरेटरची व्यवस्था आहे. यात्रोत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी देवीचे दर्शन व्हावे, यासाठी मंदीर २४ तास खुले ठेवले जाणार आहे. दर्शनास येणाऱ्या भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आल्याचे संस्थानचे अध्यक्ष केशव (अण्णा) पाटील यांनी सांगितले.