स्वरमाऊली फाउंडेशनच्या संकल्पात बदल
नाशिक: गानकोकिळा लता मंगेशकर यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी नाशिकमध्ये त्यांच्या नावे वृध्दालय उभारण्याचा संकल्प केला होता. त्याकरिता स्वरमाऊली फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाकडे जागेची मागणी करण्यात आली होती. परंतु, नव्याने प्रस्ताव सादर करताना संस्थेने वृध्दालयाऐवजी आता आरोग्य केंद्र आणि रुग्णालय उभारणीसाठी जागा मागितली आहे. प्रशासनाने त्यांना तिरडशेत येथील जागा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ज्येष्ठ कलाकारांसाठी वृध्दाश्रम असावे, असे लतादीदींचे स्वप्न होते. अनेकदा त्यांनी ते बोलूनही दाखविले होते. त्यांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांनी या स्वप्नपूर्तीसाठी पुढाकार घेतला. ज्येष्ठ कलाकारांना हक्काचा निवारा असावा, त्यांची आपुलकीने काळजी घेतली जावी, ही भावना यामागे आहे. त्या अनुषंगाने स्वरमाऊली फाउंडेशनचे मयूरेश पै आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी वृध्दाश्रम उभारणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी केली होती. या उपक्रमासाठी आडगाव शिवारातील दोन जागा सूचविल्या गेल्या होत्या.
संस्थेलाही ती जागा पसंत पडली. त्यामुळे प्रशासनाने आडगाव शिवारातील पाच एकर जागा संस्थेला देण्यासाठीचा प्रस्ताव गेल्या वर्षी शासनास पाठवला होता. तथापि, नंतर या जागेतून प्रस्तावित महामार्ग जाणार असल्याचे उघड झाल्याने उपरोक्त जागा देण्यास असमर्थता दर्शविली गेली. त्याचवेळी तिरडशेत येथील शासकीय जागेचा पर्याय सूचविला गेला. या जागेची पाहणी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि संस्थेच्या सदस्यांनी केल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा >>> Jindal fire accident: जिंदालमधील ८३ कामगार संपर्कहीन असल्याची तक्रार
जागा बदलल्याने प्रशासनाने संस्थेकडे नव्याने जागेची मागणी नोंदविण्यास सांगितले. यावेळी संस्थेचे प्रयोजन बदलल्याचे अधिकारी सांगतात. प्रारंभी वृध्दालयासाठी जागा मागितली होती. आता आरोग्य केंद्र, रुग्णालय उभारणीसाठी जागा मागण्यात आली आहे. त्यांच्या मागणीनुसार मौजे तिरडशेत येथील गट क्रमांक १९ ही शासकीय जागा मुंबईच्या स्वरमाऊली फाउंडेशन संस्थेला आरोग्य केंद्र, दवाखाना आणि रुग्णालयासाठी देण्याच्या दृष्टिने प्रशासनाने छाननी सुरू केली आहे. या जागेबाबत काही न्यायालयीन वाद आहे का, संबंधित जागेवरील अतिक्रमण, भूसंपादन वा पुनर्वसन झाले आहे का, सर्व कार्यालयांचे ना हरकत दाखले, मोजणी नकाशे, १९५० पासून सातबारा उतारे आणि नोंदी मागणी केलेल्या जागांचे वार्षिक मूल्यांकन दाखला आदींची मागणी तहसीलदार राजेंद्र नजन यांनी संबंधित विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर यासंबंधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठविला जाणार आहे.
मूळ वृध्दाश्रमाचा विषय तोच आहे. परंतु, आता तो वैद्यकीय सुविधांसह व्यापक स्वरुपात केला जाणार आहे. ज्येष्ठ कलावंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे आरोग्य केंद्र असणार आहे. त्यांना आरोग्य सेवा दिली जाईल. केवळ वृध्दाश्रम न करता आरोग्य केंद्र करीत आहोत. आधीच्या आणि आताच्या संकल्पनेत कुठलाही फरक नाही. वृध्द कलाकारांसाठीच ही व्यवस्था असणार आहे.
– मयुरेश पै (संचालक, स्वरमाऊली फाउंडेशन, मुंबई)