नाशिक – दिंडोरी तालुक्यातील वणी- नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथील रामवाडी वस्तीतील एका घराला सोमवारी सकाळी आग लागून सुमारे तीन लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पायरपाडा येथे सकाळी ढवळू गवळी यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याचे आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच आग विझवण्यासाठी ते धावले. कुडाचे घर असल्याने आग चटकन पसरली. घरातील कपडे, कागदपत्रे आणि इतर संसारोपयोगी वस्तू जळून गेल्या. शेजारच्या घरालाही आगीची झळ बसली.
हेही वाचा – जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कोण याचा तिढा सुटेना
खेडे गाव असल्याने आग विझवण्यात अडचणी आल्या. बाजूच्या शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करून आग विझवण्यात गावकऱ्यांना यश आले. आगीत घरातील सुमारे ६०७ गव्हाची पोती आणि दोन बाजरीची पोती, काही सोन्याचे दागिने, रोख ५० हजार रुपये होते. ते सर्व खाक झाले. आग लागली तेव्हा, घरातील लोक शेतात कामावर गेले होते.
हेही वाचा – सांगलीसाठी आघाडीतून मैत्रीपूर्ण लढतीसाठी कॉंग्रेसचा दबाव
या घटनेची माहिती कामगार तलाठी पालवी, अहिवंतवाडीचे ग्रामसेवक देशमुख यांना देण्यात आली. तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात तीन लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ग्रामसेवकांनी घटनेची पाहणी केली. आगीचे कारण कळू शकलेले नाही. आग विझवण्यासाठी विठ्ठल भरसट, राजेश गवळी, धनराज ठाकरे, लक्ष्मण गवळी, पोपट पवार आदींनी प्रयत्न केले.