दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याने पुन्हा एकदा एका बालिकेवर हल्ला केला असून कुटुंबीय जवळ असल्याने सुदैवाने त्या बालिकेला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यात नातेवाईकांना व उपस्थित नागिरकाना यश आले आहे. मात्र या प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.काही दिवसांपूर्वीच दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील एका शाळकरी मुलगा शाळेतून घरी जात असताना बिबट्याने त्या मुलावर हल्ला केला होता. त्यात त्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचा विसर पडत नाही तोच पुन्हा एकदा सोमवारी संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान निळवंडी शिवारातील मोराडे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुराच्या सहा-सात वर्षाच्या मुलीवर बिबट्याने पुन्हा हल्ल चढवला.
हल्ला झालेल्या मुलीचे नाव निलम गोपीनाथ वातास ही मुलगी सात वर्षाची आहे. शेतमजुरी करण्यासाठी आलेले मजूर मागील १५ दिवसापासून पत्राचे शेड मध्ये राहत आहेत. रोज प्रमाणे नीलम ही जेवण करून हात धुण्यासाठी शेडच्या बाहेर आली होती. तितक्यात बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिला फरपटत शेताच्या दिशेने गेला. हा सर्व प्रकार त्या मुलीच्या नातेवाईकांच्या डोळ्यासमोर घडला असून नातेवाईकांनी त्या बिबट्याचा जंगलात तब्बल ३०० मीटर पाठलाग करून त्या मुलीला बिबट्याच्या तावडीतुन सोडवले .
या मुलीला उपचारासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यावेळी वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनासाठी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केला आहे. येथील जमलेल्या शेतकरी, मजूर यांना खबरदारी बाबत सूचना दिल्या आहेत. मात्र या प्रकाराने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.