मालेगाव : मालेगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रामपुरा शिवारात रविवारी मध्यरात्री एका पोल्ट्री शेडमध्ये घुसलेल्या बिबट्याने धुमाकूळ घालत कोंबड्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जवळपास ४० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.
बाबाजी सोनवणे यांच्या शेतातील पोल्ट्री शेडमध्ये हा बिबट्या शिरला होता. मध्यरात्रीच्या सुमारास कोंबड्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने शेडच्या जवळच असलेल्या घराच्या ओट्यावर झोपलेले बाबाजी जागे झाले. त्यांनी मुलगा पंकज यास झोपेतून उठवत या शेडची पाहणी करण्यास सांगितले. तेव्हा लोखंडी तारांची जाळी तोडून बिबट्या शेडमध्ये शिरल्याचे त्यांना आढळून आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या बाबाजी यांच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तसेच गावातील लोकांना दूरध्वनीद्वारे यासंबंधी माहिती दिली. यानंतर या ठिकाणी लोकांचा जमाव जमला. जमलेल्या लोकांनी बॅटरीच्या साहाय्याने बिबट्याच्या दिशेने प्रकाशझोत टाकला. त्यामुळे शेडची जी जाळी तोडून आतमध्ये प्रवेश केला होता, त्याच ठिकाणाहून घाबरलेल्या बिबट्याने पहाटेच्या सुमारास बाहेर पडत धूम ठोकली.
हेही वाचा – VIDEO : अल्याड गाव, पल्याड स्मशान अन मध्येच नदी, मृतदेह स्मशानात नेणार कसा ?
हेही वाचा – VIDEO : गिरणा नदीत अडकलेल्या मालेगावातील १५ जणांची लष्करी हेलिकॉप्टरद्वारे सुटका
सोनवणे यांच्या पोल्ट्री शेडपासून जवळच जंगल परिसर आहे. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या पोल्ट्री शेडमध्ये शिरला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात वन विभागात कळविण्यात आले असून पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, रामपुरा परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस अनेकदा अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने जंगली श्वापदांपासून नेहमीच धोका संभवत असतो, अशी तक्रार सोनवणे यांनी केली. रविवारी रात्री बिबट्या जेव्हा शेडमध्ये शिरला, त्यावेळी रात्रभर वीज पुरवठा खंडित होता, असेही त्यांनी सांगितले.