नाशिक जिल्ह्यात सध्या बिबटे कुठेही दिसू लागले आहेत. सिन्नर परिसरातही त्यांचा वावर वाढला असून शेतकरी, वाहनचालकांवर हल्ले करण्यात आले आहेत. बुधवारी आडगाव परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>नाशिक: जिल्हास्तरीय सादरीकरणात तीन नवउद्यम संकल्पनांचा गौरव
सिन्नर परिसरात बिबट्याचा वावर, हल्ले वाढल्याने वन विभागाकडून सातत्याने नागरीकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यातील आडगाव परिसरात बिबट्याने कुत्रा, मांजर, गाय, बैल, शेळी या पशुधनावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी विष्णू माळोदे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. बुधवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे दिसले. बिबट्याच्या डरकाळ्यांनी नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत सुरक्षितरित्या बिबट्याला हलविले. बिबट्या मादी असून वय अंदाजे नऊ वर्ष आहे.