नाशिक – शहरापासून जवळच असलेल्या विल्होळी परिसरात काही दिवसांपासून ग्रामस्थांना दिसणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या जाळ्यात सापडला. बिबट्याला पकडण्यासाठी बुधवारी परिसरात पिंजरा लावण्यात आल्यानंतर २४ तासाच्या आत बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातीन शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील काही भागासह देवळाली कॅम्प, लहवित, विल्होळी या परिसरात वारंवार बिबट्या दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कायमच भीती असते. विशेषत: शेत शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याच्या धाकाने सायंकाळनंतर बाहेर पडणे कठीण झाले आहे. बिबट्या दिवसाही हल्ले करीत असल्याने शेतकरी अधिकच हादरले आहेत. विल्होळी गाव तसेच परिसरात मळे अधिक आहेत. या मळ्यांमध्ये काही दिवसांपासून शेतकऱ्यांना बिबट्या दिसत होता. बिबट्याने काही ठिकाणी जनावरांवरही हल्ले केले होते. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. वनविभागाच्या वतीने परिसरात बुधवारी पिंजरा लावण्यात आला. अंकुश चव्हाण यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात गुरूवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाला. त्याचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी पिंजऱ्याच्या दिशेने धाव घेतली. वनविभागाला याविषयी माहिती देण्यात आल्यावर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या चार वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.