नाशिक: गोविंदनगरमधील अशोका प्राईड इमारतीत एका सदनिकेत शिरलेल्या बिबट्याला खोलीत बंद करणे शक्य झाले, ते मॅक्स या डॉबरमॅन पाळीव कुत्र्याने दिलेल्या सूचक संदेशामुळे. डॉ. सुशील अहिरे यांच्यासोबत बाहेरून फिरुन घरी आल्यावर मॅक्स अकस्मात अस्वस्थ झाला. बिबट्या ज्या खोलीत कपाटावर बसला होता, तिथे जाऊन भुंकू लागला. मॅक्सचे संकेत डॉ. अहिरे यांनी गांभिर्याने घेतले. बिबट्याला पाहताच त्या खोलीचा दरवाजा विलंब न करता बंद केला. ही बाब अतिशय वर्दळीच्या रहिवासी क्षेत्रात आणि ८० सदनिकेच्या इमारतीत कुठलाही अनर्थ न घडता बिबट्याला जेरबंद करण्यात महत्वाची ठरली.
दिवाळीच्या सुट्टीतील शुक्रवारची सकाळ नाशिककरांमध्ये भीती पसरवणारी ठरली. सिडकोत दाखल झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असतानाच याच सुमारास गोविंदनगरमधील अशोका प्राईड इमारतीत अजून एक बिबट्या शिरला. या इमारतीत तळमजल्यावर डॉ. सुशील अहिरे यांची (अंतर्गत जिना असणारी दुहेरी) सदनिका आहे. ते सकाळी नेहमीप्रमाणे मॅक्ससोबत फिरायला गेले होते. त्यांच्या घरातील एका खोलीत बिबट्या वातानुकूलीत यंत्रालगत कपाटावर जाऊन बसला. तेव्हा घरात केवळ डॉ. अहिरे यांची पत्नी डॉ. प्रतिभा अहिरे होत्या. त्या एका खोलीत झोपल्या होत्या. काही वेळात डॉ. सुशील घरी परतले.
हेही वाचा… नाशिकमधील सिडकोत एक बिबट्या जेरबंद, गोविंदनगरमध्ये दुसऱ्याला पकडण्यासाठी शिकस्त
दरवाजाजवळ पोहचताच मॅक्सचे वागणे बदलले. तो एकदम अस्वस्थ झाला. भुंकत, भुंकत तो घरात येरझाऱ्या घालू लागला. एक-दोन वेळा तर तो बिबट्या असणाऱ्या खोलीत गेला. अकस्मात बदललेले त्याचे वागणे पाहून डाॅक्टरही सावध झाले. घरात उंदीर शिरला तरी मॅक्सचे वागणे बदलते. आपण मॅक्सच्या संकेतानुसार त्या खोलीत नेमके काय आहे, हे बघायला गेलो तर, कपाटावर बिबट्याचे दर्शन घडले, असे डॉ. अहिरे यांनी सांगितले.
बिबट्याला पाहिल्यानंतर आपण क्षणाचाही विलंब न करता त्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. पत्नीला इशारा देत घराबाहेर जाण्यास सांगितले. खोलीत बंद केलेल्या बिबट्याची माहिती वन विभागाला दिली. १० ते १५ मिनिटांच्या या नाट्यमय घडामोडी होत्या, असे डॉ. अहिरे यांनी नमूद केले.
हेही वाचा… नाशिकमध्ये दुसरा बिबट्याही जेरबंद; निवांत बसलेला ‘एसी’च्या बाजुला!
घरात आगंतुकाप्रमाणे दाखल झालेल्या बिबट्याने स्वयंपाक घरातील ओट्यासह इतरत्र फेरफटका मारल्याच्या खुणा आढळल्या. सदनिकेतील अन्य खोलीत प्रकाशाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे बिबट्या जिथे प्रकाशाची तीव्रता कमी, अशा खोलीत गेल्याचा अंदाज डॉ. अहिरे यांनी व्यक्त केला. बिबट्याची चाहूल सर्वप्रथम मॅक्सला लागली. मॅक्स डॉबरमॅन कुत्रा असून तो साडेचार वर्षाचा आहे. त्याचे संकेत आणि डॉक्टरांची सतर्कता वन विभागाचे काम सोपे करणारी ठरली.