नाशिक – देवळाली कॅम्प येथील जुन्या स्टेशन वाडीजवळ असलेल्या पगारे चाळीलगत नाल्यात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. दोन महिन्यात याच ठिकाणावरुन तीन बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत.
काही महिन्यापूर्वी पगारे चाळीजवळील भिंतीवर तीन बिबटे बसल्याची चित्रफित समाज माध्यमात फिरत होती. त्यामुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. स्थानिकांच्या मागणीवरुन वन विभागाने पिंजरा लावला. दोन महिन्यात तिसरा चार वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनरक्षक विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे, अंबादास जगताप, प्राणी मित्र विक्रम काडळे यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्यास पिंजऱ्यातून गंगापूर रोपवाटिका येथे नेले. तेथे वैद्यकीय उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. जेरबंद बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परिसरात आणखी बिबटे असून त्यांना पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.