नाशिक – शहरातील नामांकित रचना विद्यालय या शाळेची जागा बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. या संदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांची भेट घेतली. भूमाफियांनी मराठी शाळेची गळपेची चालविल्याकडे लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरणपूर रस्त्यावरील रचना विद्यालय ही शहरातील अतिशय जुनी, नावाजलेली मराठी शाळा आहे. महाराष्ट्र समाज सेवा संघ ५४ वर्षांपासून नाशिक डायोसेशन ट्रस्टच्या जागेवर संस्थेने बांधलेल्या इमारतीत ती चालविली जाते. तेव्हापासून सहा हजार चौरस मीटर क्षेत्राची जागा संस्थेच्या ताब्यात आहे. प्रारंभी भाडेतत्वावर आणि नंतर ही जागा खरेदी करण्यासाठी संस्थेने २००० साली नोंदणीकृत साठेखत करारनामाही केला आहे. खरेदी होईपर्यंत ही जागा भाडेकरु हक्काने महाराष्ट्र समाज सेवा संघाकडे राहणार असल्याचे करारनाम्यात नमूद आहे. असे असताना शाळेच्या मैदानातील काही क्षेत्राचे नाशिक डायोसेशन कौन्सिल ट्रस्ट प्रा. लि. ( एनडीसीडी प्रा. लि.) या कंपनीने तिऱ्हाईत व्यक्तीला भाडे करारनामा करून दिला.

हेही वाचा >>>चाळीत युरिया टाकल्याने कांद्याचे नुकसान- वाखारीतील घटना

बंद पडलेल्या कंपनीत काहींनी स्वत:ची नावे संचालक म्हणून नोंदवत बेकायदेशीर व बनावट दस्तावेजाने व्यवहार केला. या बनावट दस्ताचा आधार घेऊन शाळेची जागा २० ऑक्टोबर रोजी सायंकाळनंतर पत्र्याची शेड व दरवाजा उभारून बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. या घटनाक्रमाने संस्थेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर माजी विद्यार्थी व पालकांनी संस्थेशी संपर्क साधून भूमाफियांविरोधात लढा देण्याची तयारी दर्शविली. शाळेची जागा बळकावण्याचा प्रकार धक्कादायक आहे. यात सामील भूमाफीयांवर कठोर कारवाईची मागणी संस्थेने प्रशासनाकडे केली. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A march against the land mafias who are trying to illegally occupy the site of the renowned rachna vidyalaya in nashik city amy