केंद्रात पाच लिटर प्रतिदिन इंधन क्षमता
नाशिक – महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पात कचऱ्याचे चांगल्या पध्दतीने वर्गीकरण करण्यासाठी २५० मेट्रिक टन क्षमतेचा नवीन संच उभारण्यात आला आहे. त्याद्वारे सुक्या कचऱ्याचे तीन, चार प्रकारात वर्गीकरण होते. त्यापासून उच्च प्रतिचे आरडीएफ तयार करणे दृष्टीपथास येईल. दैनंदिन कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण पाहता त्यातील चांगल्या प्रतिच्या प्लास्टिकपासून इंधन तयार करणे शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रात पाच लिटर प्रतिदिन क्षमतेच्या प्लास्टिक ते इंधन (फ्युएल) सयंत्राची उभारणी करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत बुधवारी हे दोन्ही संयंत्र कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे शहरातील दैनंदिन कचऱ्यावर आणखी चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट लावता येणार आहे. नाशिक घन कचरा प्रकल्पात सध्या ट्रोमेलद्वारे वर्गीकरण करण्यात येते. दैनंदिन येणाऱ्या कचऱ्याचे अधिक चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी २५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा नवीन संच उभारण्यात आला आहे. त्या माध्यमातून कचऱ्याचे तीन ते चार प्रकारात वर्गीकरण होईल.प्रकल्प उद्घाटनप्रसंगी मनपाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, कर्नल सुरेश रेगे (निवृत्त), उपमहाव्यवस्थापक मयुरेश अमराळे आदी उपस्थित होते,
हेही वाचा >>>नाशिक: बागलाण तालुक्यात दोन बालमजुरांची सुटका; दोन संशयितांविरुध्द गुन्हा
खत निर्मितीपासून इंधनापर्यंत
२००१ पासून घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता महानगरपालिकेने प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रारंभी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा ३०० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला होता. काही वर्षांनी त्यात वाढ करून प्रकल्पाची क्षमता ५०० मेट्रिक टन प्रतिदिनपर्यंत वाढविण्यात आली. या केंद्रात जळाऊ कचऱ्यापासून आरडीएफ तयार करण्याच्या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला.
हेही वाचा >>>धुळ्यात करोना केंद्रासाठी युवा सेनेचे आंदोलन
कंपनीकडून गुंतवणूक
बरीच वर्ष मनपाकडून चालविला जाणारा हा प्रकल्प नंतर खासगी कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात आला. या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ निर्मिती, बागेतील कचरा व पाला पाचोळ्यापासून ब्रिकेट निर्मिती, प्लास्टिकपासून प्लास्टिक दाणे तयार करणे, मृत जनावरे शवदाहिनी, शास्त्रोक्त पध्दतीने वापरलेल्या कचऱ्याचे थर लावणे (लँडफील) आदी कामे होतात. कचऱ्याचे वर्गीकरण व प्लास्टिकपासून इंधन निर्मिती या नव्या प्रकल्पासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने गुंतवणूक केली आहे. करारानुसार हा त्यांच्या जबाबदारीचा भाग असल्याचे मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.