नाशिक – गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शुक्रवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला सुमारे १४ हजार कोटींचा प्रारुप आराखडा यावेळी सादर होणार आहे.
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केवळ दोन वर्षांचा अवधी बाकी आहे. नियोजनाला विलंब होत असल्याने त्यास गती देण्याकरिता सिंहस्थाची विस्तृत स्वरुपाची बैठक घेण्याचे सुतोवाच कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच नाशिक दौऱ्यात केले होते. त्यानंतर लगोलग ही बैठक होत आहे.
हेही वाचा >>>पाणी नियोजन बैठकीत अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस
सिंहस्थासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समित्या कार्यरत आहेत. २०१५ मधील कुंंभमेळ्याचा आराखडा सुमारे २३०० कोटींचा होता. आगामी कुंभमेळ्यात त्यामध्ये चार ते पाच वाढ होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यंदा ६९७८ कोटींचा आराखडा सादर केला आहे. आगामी सिंहस्थासाठी तपोवनमध्ये ४०० एकर क्षेत्रात साधुग्रामचे नियोजन असून तीन आखाड्यांचे सुमारे चार लाख साधू-महंत या ठिकाणी वास्तव्यास येण्याचा अंदाज आहे. एका पर्वणीत ८० लाख भाविक शहरात येतील. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेबरोबर त्र्यंबकेश्वर नगरपालिका व अन्य विभागांनी कामांचे नियोजन केले आहे. आगामी कुंभमेळ्यात सुरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य राहणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.