नंदुरबार – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. शहरातील सीबी मैदानावर गांधी यांची जाहीर सभा होणार असून यावेळी गांधी यांच्यासाठी आदिवासींच्या वतीने विशेष पारंपरिक होळीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात दाखल होत असलेल्या यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दिल्लीतील वरिष्ठांसमवेत काँग्रेसचे नेते तथा माजी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी सभास्थळी तळ ठोकून आहेत. सोनगढ येथील यात्रेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर गांधी दिल्लीला परतले. ते मंगळवारी सुरतला विमानाने आणि सुरतहून नंदुरबारकडे हेलिकॉप्टरने प्रस्थान करतील. गांधी परिवारातील सदस्य १४ वर्षानंतर नंदुरबारमध्ये दाखल होत असल्याने राहुल गांधी यांच्यासाठी खास नवसाची होळी पेटवली जाणार आहे. देशात चांगला आणि पारदर्शक कारभार राहावा, शांतता नांदावी, यासाठी ही नवसाची होळी आहे. यासाठी खास कलापथक धडगावमधून नंदुरबार येथे येणार आहे. कार्यक्रमात पथकाबरोबर गांधीही सामील होणार आहेत. ते सभा स्थळापासून शहरातून धुळे जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत.
हेही वाचा >>>नाशिक : व्यावसायिकाकडून साडेबारा लाखांची खंडणी उकळणारे तिघे ताब्यात
ज्या नंदुरबार जिल्ह्यावर गांधी घराण्याचे विशेष प्रेम राहिले, त्या नंदुरबारकडे २०१० नंतर गांधी घराण्याचा एकही सदस्य फिरकला नाही. त्यामुळेच की काय तब्बल १४ वर्षानंतर राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये दाखल होत असल्याने आदिवासी समाजात मोठी उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा नंदुरबारमध्ये दाखल होत असल्याने काँग्रेसला उभारी आली आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यात गांधी घराण्याविषयी असलेले आकर्षण कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने थेट या यात्रेचे नाव बदलून नंदुरबारमध्ये भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा असे नामकरण केले आहे. आदिवासी बांधवांना पुन्हा काँग्रेसकडे खेचण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली आहे. १० वर्षात केंद्रातील मोदी सरकारने कशा पद्धतीने आदिवासी बांधवांचे शोषण केले. धनदांडग्यांना कसा लाभ मिळाला, हे यात्रेतून दाखविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.