नाशिक- अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील दोन ठिकाणी छापे टाकत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा लाखो रुपयांचा साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सातपूर येथे पवन कोतकर यांच्या दुकानावर छापा टाकला. दुकानात ११,२७२ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. हा साठा जप्त करण्यात आला. संशयित कोतकर विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा छापा पंचवटीतील पेठरोड येथील बाळकृष्ण सदन येथे टाकण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे पथक चौकशीसाठी गेले असता घर कुलूपबंद स्थितीत आढळले. परिसरात चौकशी केली असता जागा मालक शिवाजी पवार हे उपस्थित झाले. त्यांचा जबाब नोंदविला असता गोदाम दिनेश अमृतकर यांना भाड्याने दिल्याचे सांगितले. गोदामात अधिकाऱ्यांनी खिडकीतून डोकावले असता प्रतिबंधित अन्न पदार्थाची पोती साठविल्याचे आढळून आल्याने पंचवटी पोलीस ठाण्यातून बंदोबस्त मागविण्यात आला.
हेही वाचा – गंगापूर रोड भागात बिबट्याचा वावर, वन विभागाकडून सावधगिरीच्या सूचना
हेही वाचा – नाशिकरोडमध्ये दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू
पोलिसांच्या उपस्थितीत व पंचाच्या समक्ष गोदामाचे कुलूप अधिकाऱ्यांनी तोडले. प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. हा साठा १० लाखांपेक्षा अधिक किमतीचा असून सायंकाळी उशिरापर्यंत मोजमाप सुरू होते. संबंधिताविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांची माहिती असल्यास १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त म. मो. सानप यांनी केले आहे.