नाशिक – देवळाली कॅम्प परिसरात दोन गटात झालेल्या वादात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयिताच्या मुलीचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयाच्या आवारात आणल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी हे प्रकरण संयमाने हाताळल्याने मृतदेहावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.देवळाली कॅम्प परिसरातील संसरी गावात सागर गोडसे व हर्षद त्रिभूवन आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये काही कारणावरून वाद झाले होते. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षद व त्याच्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सागरच्या दोन वर्षाच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असतांना तिचा शनिवारी मृत्यू झाला. नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयात आणत आम्हाला गावबंदी असल्याने बालिकेवर अंत्यसंस्कार करता येणार नसल्याचे सांगितले. आयुक्तालयाने स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क करत माहिती घेतली. बंदोबस्तात त्या बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयी पोलीस सहआयुक्त मोनिका राऊत यांनी, नातेवाईकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे मांडले. ज्या काही अडचणी होत्या. त्या अडचणी सोडण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगितले.