नाशिक – सिडकोतील बिबट्याला जेरबंद केल्यानंतर वन विभागाच्या पथकाने गोविंदनगरमधील एका इमारतीतील सदनिकेत शिरलेल्या बिबट्याला तीन तासांच्या प्रयत्नांनी जेरबंद केले. बेशुध्दीचे इंजेक्शन डागण्यासाठी सदनिकेतील एका भिंतीला भगदाड पाडावे लागले.
शहरातील सिडको आणि गोविंदनगर भागात शुक्रवारी दोन बिबट्यांचा संचार आढळून आल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. वन विभागाने सिडकोतील रायगड चौकात बिबट्याला जेरबंद केले. तर, गोविंद नगरमधील अशोका प्राईड इमारतीत एका सदनिकेत शिरलेल्या बिबट्याला जागरुक डॉक्टराने खोलीत बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. इमारतीच्या तळ मजल्यावर वास्तव्यास असणारे डॉ. सुशील अहिरे यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याला सदनिकेतील एका खोलीत बंद करणे शक्य झाले. सकाळी ते कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. घरी परतल्यानंतर कुत्रा अकस्मात अस्वस्थ झाला. जोरात भुंकू लागला. हे पाहून डॉ. अहिरे यांनी आपल्या घरातील एका खोलीची पडताळणी केली असता बिबट्या दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ही खोली बंद करून वन विभागाला माहिती दिली.
खोलीतील बिबट्याला बेशुध्द करून ताब्यात घेण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. सदनिकेतील खोलीत बिबट्या कपाटावर जाऊन बसला होता. बाहेरून काठ्या वाजवूनही तो ती जागा सोडत नव्हता. त्यामुळे त्याला बेशुध्द करण्यासाठी खिडकीतून इंजेक्शन डागणे शक्य होत नव्हते. अखेर वन विभागाच्या पथकाने खोलीच्या भिंतीला भगदाड पाडण्याचे ठरवले. त्यानुसार भिंत फोडून इंजेक्शन डागण्यात आले. काही वेळात बिबट्या बेशुध्द पडला. वन विभागाने जाळीतून त्याला पिंजऱ्यात नेले. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला सुमारे तीन तास प्रयत्नांची शिकस्त करावी लागली.