लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार: नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात बुधवारी बाजारपेठेत पेटत्या ट्रँक्टरचा थरार अनुभवयास मिळाला. चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला.
खांडबारा गावातून दुपारी शेगवा, आंबाफळीहून एक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चारा घेवून गुजरातकडे जात होता. खांडबारा बाजारपेठेतून ट्रॅक्टर जात असताना ट्रॉलीतील चाऱ्याने पेट घेतल्याचे निदर्शनास आले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ट्रॅक्टर असल्याने चालकाने प्रसंगावधानता दाखवित ट्रॅक्टर न थांबविता गावाबाहेर नेला. गावाबाहेर आल्यानंतर ट्रॅक्टर त्यांनी ट्रॉलीपासून वेगळा केला. त्यानंतर ट्रॉलीमध्ये असलेला चारा आणि ट्रॉली खाक झाले.
हेही वाचा… बिहारमधून महाराष्ट्रात बालकांची तस्करी; दानापूर – पुणे एक्स्प्रेसमधून ५९ बालकांसह पाच संशयित ताब्यात
दरम्यान, खांडबाऱ्यातील बाजारपेठेच्या अरुंद रस्त्याने ट्रॅक्टर जात असतांना जळालेला चारा उडत असल्याने काही दुकानदारांनी सावलीसाठी बांधलेले पडदे जळाले. गावकरी आणि ट्रॅक्टर चालक यांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी यातून प्रशासनाने बोध घेवून गावातील रस्त्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.