जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील 43 वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. त्यात ती जागीच ठार झाली. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता पाटील या पती कैलास पाटील, सासू इंदूबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह राहत होत्या. आठ दिवसांपासून कैलास पाटील हे आजारी आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संगीता पाटील या शुक्रवारी (6 जानेवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास सासू इंदूबाई यांच्यासोबत रुग्णालयात येण्यासाठी निघाल्या होत्या.
हेही वाचा – शेतजमीन, वहिवाटीचे वाद मिटवा केवळ दोन हजार रुपयांत, शासनाची सलोखा योजना
कुसुंबा गावातून येत असताना ट्रॅक्टरच्या मागून रस्ता ओलांडताना भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. त्यात संगीता पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. लगेच त्याच रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.