नाशिक: फटाके फोडण्यावरून मागील भांडणाची कुरापत काढत दिवाळी पाडव्याच्या रात्री पाथर्डीजवळील स्वराज्य नगरात युवकाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. मारेकरी मयत युवकाचे मित्रच आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गौरव आखाडे (३१) असे मयताचे नाव आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री नऊच्या सुमारास तुकाराम आखाडे यांच्या घराजवळ राहणारे शिंदे कुटुंबीय फटाके फोडत होते. आखाडे यांच्या घरात लहान बाळ असल्याने त्यांनी या ठिकाणी फटाके फोडू नका, आम्हाला त्रास होतो, असे सांगितले. याचा राग आल्याने दोन्ही कुटुंबियांमध्ये हाणामारी देखील झाली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. वाद मिटला, असे वाटत असताना दोन दिवसांनी पुन्हा वाद उदभवला. दिवाळी पाडव्याच्या रात्री १० वाजेच्या सुमारास शिंदे कुटूंबियांचा आखाडे यांच्याशी वाद झाला. संशयित गणेश शिंदे, नारायण शिंदे आणि त्यांचे वडील बबन शिंदे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी गौरव आखाडे यास घराजवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धारदार शस्त्र, कोयत्याचे गौरवच्या छातीवर आणि पायावर वार केले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने गौरवचा मृत्यू झाला.
हेही वाचा… नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी; कोकण, केरळलाही पसंती
इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही तासातच मुख्य संशयित गणेश शिंदे (२२), नारायण शिंदे (२६), नितीन खरात (२२), चेतन काळे (२१), गौरव घनघाव (१९), बबनराव शिंदे (५३) यांच्यासह एक अल्पवयीन ( सर्व रा. स्वराज्य नगर, पाथर्डी शिवार) अश्या सात जणांना ताब्यात घेतले आहे.