लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: घरी जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून पुरात उडी घेणाऱ्या तरुणास सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. रावेर तालुक्यातील ही घटना आहे. गणेश कोळी (३५, रा. मांगी, रावेर) असे या तरुणाचे नाव आहे.

रावेर शहरासह तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे सुकी, भोकर, नागझिरी, नागोई, मात्राण, खडखडी, पाताळगंगा या नद्या आणि गवळी, लेंडी, कर्जोद, मच्छी आदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन प्रभावित झाले होते. बुधवारी वाघोड येथील रेल्वेपुलाखालील नाल्याच्या पुरात तरुण वाहून गेल्याच्या घटनेने चिंता व्यक्त केली जात होती.

हेही वाचा… नाशिक : बँकेवर दरोड्याचा प्रयत्न, गस्ती वाहनामुळे चोरटे पसार

वाघोड येथे कर्जोद नाल्याच्या पुरातून मोरगावकडे जात असलेल्या गणेश कोळी याला तेथील नागरिकांनी पुरातून जाण्यास मज्जाव केला. मात्र, न जुमानता तो पुढे गेला. रेल्वेपुलाखालून तो वाहून गेला. पुढे त्याला मोरगावजवळ पट्टीच्या पोहणार्‍यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पुरातून सुखरूप बाहेर काढले. आपण स्वतःच पुराच्या पाण्यात उडी घेतली होती. घरी जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उडी घेतली होती, असे त्याने उत्तर देताच सर्वांनीच डोक्याला हात मारून घेतला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youth who jumped into the flood as a way to get home has been rescued safely in jalgaon dvr