अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसैनिकांचे साकडे
अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीपर्यंत तेवत ठेवण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली आहे. अयोध्येहून आणलेल्या शरयूच्या तीर्थाने बुधवारी सकाळी येथील काळाराम मंदिरात अभिषेक तसेच महाआरती करण्यात आली. अयोध्येत राम मंदिराची उभारणी व्हावी, असे साकडे काळारामास घालण्यात आल्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने मंदिर परिसर दणाणला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात नाशिकहून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. अयोध्येला जाण्यासाठी खास रेल्वे गाडी सोडण्यात आली होती. अयोध्येला जाताना शिवसैनिकांनी गोदावरी नदीचे तीर्थ नेले होते. त्या कलशाचे विधिवत पूजन करून ते ठाकरे यांनी शरयू नदीच्या पात्रात अर्पण केले. शरयू नदीचे तीर्थ त्या कलशात घेऊन काळाराम मंदिरात अभिषेक करण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी साडे आठ वाजता संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली जल कलश काळाराम मंदिरात आणला गेला. महंत सुधीरदास पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी आदींनी विधिवत पूजन करून जल अभिषेक केला. नंतर महाआरती करण्यात आली.
अयोध्येत रामाचे मंदिर व्हावे, याकरिता काळारामास शिवसैनिकांनी साकडे घातल्याचे चौधरी यांनी सांगितले. गोडसे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला. शिवसेनेची स्थापना हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर झाली आहे. पहिल्यांदा मंदिर, मग सरकार या पक्षप्रमुखांच्या घोषणेला देशभरातून प्रतिसाद मिळाल्याचा दावा गोडसे यांनी केला. यावेळी ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख सचिन मराठे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या कोंडीचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनात नाशिकला अधिक महत्त्व दिले गेले होते. अयोध्येत शक्ती प्रदर्शनासाठी पुरेशी रसद पोहोचविण्याची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली होती. यामुळे अयोध्येसाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीत नाशिकचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने होते. अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाआरती सुरू असताना नाशिक येथे गोदावरी तिरावर शिवसैनिकांनी महाआरतीचे आयोजन केले होते.