कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व ७ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज (सोमवार) हा निकाल दिला. जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून नियमित सुनावणी सुरू होती. देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयाने याप्रकरणी ४९ जणांच्या साक्षी नोंदवल्या. अखेर भक्कम पुराव्या अभावी या सर्वांची मुक्तता करण्यात आल्याचे न्यायाधीशांनी निकाल देताना सांगितले.
सीबीआयने २५ ऑगस्ट २००४ मध्ये या प्रकरणात तेलगीसह सहा आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात नाशिकरोड येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून स्टॅम्प छापल्यानंतर ते देशभर रेल्वेने पाठवले जात असत. तेलगीने रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हा स्टॅम्प चोरीचा प्रकार सुरू केला होता, असा आरोप त्याच्यावर होता. यातूनच नंतर तेलगीने पुढे ३२ हजार कोटींचा घोटाळा केला. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी या प्रकरणात आरोपी होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.