लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना ताजी असताना, आता पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करीत गळा आवळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी पारोळा येथील पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ही घटना जिल्ह्यात पंधरवड्यातील दुसरी आहे.
धुळपिंप्री येथील मुलगी गावानजीकच्या नदीपात्रात नैसर्गिक विधीसाठी गेली होती. यावेळी बारक्या ऊर्फ अशोक भिल याने अत्याचार केला. त्यास मुलीने विरोध केल्याने बारक्याने मुलीच्या डोक्यात दगड टाकत दोरीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या तावडीतून सुटका करीत घरी आली. तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. सुरुवातीला मुलीवर पारोळा कुटिर रुग्णालयात आणि नंतर धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा-नाशिक: द्राक्ष उत्पादकाची फसवणूक; तीन संशयितांविरुध्द गुन्हा
घटनेची माहिती समजताच संतप्त ग्रामस्थांसह समाजबांधवांनी पारोळा येथे महामार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करून संशयिताला फाशी द्या, नाहीतर त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोषीला कठोर शिक्षा करावी, अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना केल्या. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनीही पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती जाऊन घेत सूचना केल्या.