जळगाव : केंद्रातील सरकारने कायमच शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले आहे. या सरकारने सत्तेचा गैरवापर केला. देशात महागाई वाढली. जनतेला सत्ता मिळाल्यावर ५० दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन २०१४ मध्ये देण्यात आले होते. मात्र, महागाई कमी झालीच नाही, तर अधिकच वाढली, असे टीकास्त्र सोडत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.
शरद पवार यांची रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथे दुपारी जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये युवकांना रोजगार देण्याचे वचन दिले होते. महिलांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मोदींनी कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. सत्तेचा दुरुपयोग करीत ती स्वार्थासाठी वापरली. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी इंधनाचा वापर करावा लागतो. मात्र, आता त्यांचे दर वाढले आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. गॅस सिलिंडरचेही दर कमी करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आज अकराशे रुपयांपर्यंत सिलिंडरचे भाव गेले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे वचन मोदींनी दिले, तेही पूर्ण केले नाही. आज देशात रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोदी केवळ घोषणाच करतात. दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, मोदींना त्यांचे प्रश्न काय आहेत, हे समजून घ्यावेत, असे वाटले नाही. म्हणून आज शेतीची अवस्था वाईट झाली आहे, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा – जनतेच्या पैशांची जीएसटीच्या माध्यमातून लूट, जयंत पाटील यांचा आरोप
हेही वाचा – वंचितचेही शक्तिप्रदर्शन; करण गायकर, मालती थवील यांचे अर्ज दाखल
मोदींवर टीका केल्यामुळे केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले. राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने या देशासाठी त्याग केला आहे, सेवा केली आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करत आहात, असे त्यांनी नमूद केले.