बनावट दस्ताऐवजांच्या आधारावरून सौदापावत्या करीत कोट्यवधींची मालमत्ता हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद देशमुख, जितेंद्र ऊर्फ रवी देशमुख, अॅड. सुरेखा पाटील, अॅड. सतीश चव्हाण यांच्यासह ११ जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवणूक व कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र देशमुखांविरुद्ध एकाच महिन्यातील फसवणुकीचा हा दुसरा गुन्हा असून, आधीच्या गुन्ह्यात ते कारागृहात आहेत.
शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत मनोज वाणी (४१) हे वास्तव्यास आहेत. पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार वाणी यांच्यासह त्यांची पत्नी कल्पना अशा दोघांच्या नावावर राजेश पाटील यांना मृत्युपत्राद्वारे मिळालेली पिंप्राळा शिवारातील मालमत्ता ३० लाखांत तीन ऑक्टोबर २०१९ रोजी नोंदणीकृत खरेदीखतान्वये खरेदी केली आहे. तेथे आजही वाणी दाम्पत्याचे वास्तव्य आहे. त्यानंतर घनश्याम पाटील यांच्याकडून भाडेतत्त्वाच्या करारनाम्यानुसार १८ मार्च २०१६ रोजी मेहरुण शिवारातील रामदास कॉलनी भागातील प्लॉट क्रमांक १८/२ची इमारत व्यावसायिक वापराकरिता १० वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपये भाड्याने घेतली आहे. ही मालमत्ता राजेश पाटील यांनी पती-पत्नीला नोंदणीकृत खरेदीखत करून दिली आहे.
हेही वाचा: धुळे पोलिसांकडून बनावट दारुचा अड्डा उद्ध्वस्त; ९५ लाखांपेक्षा अधिकचा ऐवज हस्तगत
वाणी यांच्या मालकीचे राहते घर आणि रामदास कॉलनीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीमधील तळमजल्यावरील मिळकती बनावट सौदेपावत्या या राजेश पाटील यांनी त्यांचे सहकारी जितेंद्र देशमुख (रा. अयोध्यानगर), मिलिंद सोनवणे (रा. नूतनवर्षा कॉलनी), जगदीशचंद्र पाटील (रा. खोटेनगर), सुजाता पाटील (रा. शिवरामनगर), विनिता पाटील (उदयपुरा, बंगळुरू), लीना बंड (रा. अमरावती), अनिता चिंचोले (रा. आदर्शनगर, जळगाव), अॅड. सतीश चव्हाण (रा. रामबाग कॉलनी, जळगाव), अॅड. सुरेखा पाटील (रा. जळगाव), विनोद देशमुख (रा. महाबळ) यांनी आपापसांत संगनमत करून सुमारे ६० लाख रुपये किमतीच्या दोन्ही मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने मागील तारखेचे (२०१७ मधील) मुद्रांक विकत घेऊन बनावट सौदापावत्या करून त्या खर्या भासविल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.