एकदा केलेली चूक पुन्हा होणार नाही, हे तत्व कामात आणि अभिनयात तंतोतंत पाळले. पैसा खर्च करून नाटक बघण्यासाठी येणाऱ्या रसिकांना आपण बांधील आहोत, याची आपल्यासह सर्व कलाकार, रंगमंचामागील तंत्रज्ञानलाही कल्पना असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नाशिक येथे केले.
कालिदास कलामंदिर नाट्यगृहात दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रशांत दामले यांना सहावा अक्षय्य पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. व्यासपीठावर मुलाखतकार सुधीर गाडगीळ, हेमंत बरकले, प्रा. रवींद्र कदम आदी उपस्थित होते. यावेळी गाडगीळ यांनी प्रशांत दामले यांची मुलाखत घेतली.
हेही वाचा – नवीन नाशिकमध्ये बुधवारी पाणी पुरवठा बंद; जल वाहिनीची गळती दुरुस्ती केली जाणार
हेही वाचा – वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागात समन्वयाचा प्रयत्न करणार, कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर
दामले यांनी गायक, अभिनय, निर्माता आणि पालक या सर्व भूमिकांविषयी माहिती दिली. संहितेची निवड, वेळेचे व्यवस्थापन आणि सहकाऱ्यांचे सहकार्य या त्रिसुत्रीमुळे चार दशकांपासून रंगभूमीवर यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवात भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी यांची गाणी थेट ऐकण्याचा योग आल्यामुळे कान तयार झाले. हा अनुभव पुढे कामास आल्याचे त्यांनी सांगितले. नाटकात जम बसल्याने चित्रपटात फारसे रमलो नाही. राजा गोसावी, अशोक सराफ, शरद तळवळकर, सुधीर जोशी यांच्याकडून खूप काही शिकल्याचे दामले यांनी सांगितले.