जळगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी मंगळवारी किनगाव (ता.यावल) येथे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे जात असलेल्या चार महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात चार महिला कर्मचारी जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर मतदानासाठी प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. मंगळवारी सकाळपासूनच मतदान केंद्रांसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके आपआपले सामान घेऊन केंद्रांकडे निघाल्याचे चित्र दिसत आहे. दुपारपर्यंत अनेक अधिकारी व कर्मचारी हे ईव्हीएम यंत्रे व मतदान साहित्यासह मंगळवारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. जळगाव येथून रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य घेऊन जाताना केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी सुलताने, प्राथमिक शिक्षिका ज्योती भादले, कविता बाविस्कर आणि लतिफा खान यांच्या वाहनाला यावल तालुक्यात किनगाव बुद्रुक गावाजवळ अपघात झाला.

हेही वाचा – नाशिक : प्रचार फेऱ्यांमुळे वाहतूक कोंडी

हेही वाचा – ११० पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे; मद्य, गुटखा, शस्त्रास्त्रे जप्त

या अपघातात चारही महिला कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना चोपडा येथे तातडीने हलविण्यात आले. अपघातामुळे मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली असून, पर्यायी व्यवस्थेद्वारे मतदान साहित्य निर्धारित केंद्रांवर पोहोचविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.